पुणे : पुणे येरवड्यात दहशत माजवणा-या गुन्हेगार प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांना पोलिसांनी जाब विचारला. मोक्का कारवाईतून जामीन मिळाल्यानंतर कसबे आणि त्याच्या साथीदारांनी येरवड्यात दुचाकींवरून फेरी काढून दहशत माजवली होती. सोशल मीडियावर येरवड्यातील भाई मीच अशी पोस्ट त्याने केली होती.
पोलिसांनी कारवाई करत कसबेच्या ३५-४० साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुरुवारी रात्री साथीदारांना ताब्यात घेऊन लक्ष्मीनगर चौकात तात्पुरता मंडप उभारून त्यांना चोप दिला. त्यानंतर त्यांची धिंड काढण्यात आली. या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले. गुन्हे शाखेचे डीसीपी निखील पिंगळे, परिमंडळ चारचे डीसीपी हिमत जाधव, येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई लहू गडमवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सोळुंके पुढील तपास करत आहेत. मुख्य आरोपी प्रफुल्ल कसबेचा शोध सुरू आहे.