परभणी : येथून जवळच असलेल्या तट्टू जवळा येथे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विद्यार्थ्यांना जि.प. आरोग्य विभागाचे योग प्रशिक्षक गजानन चौधरी, आरती शिंदे व शरयू यादव यांनी यौगीक क्रियांबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
परभणी तालुक्यातील तट्टू जवळा येथे दि. ११ ते १६ जानेवारी दरम्यान श्री शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर आयोजित केले आहे. यादरम्यान दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. योग प्रशिक्षक गजानन चौधरी, आरती शिंदे व शरयू यादव यांनी प्राणायाम, योगासने व ध्यान क्रियांची प्रात्यक्षिकासह सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. शयनस्थिती, विपरीत शयणस्थिती, बैठक स्थिती व दंड स्थिती मधील महत्त्वाच्या योगासनाच्या क्रिया घेण्यात आल्या. शुद्धिक्रिया व प्राणायाममध्ये दीर्घ श्वसन, कपालभाती व अनुलोम-विलोम क्रिया प्रात्यक्षिकासह घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना घेऊन तर समारोप शांतीपाठ घेऊन करण्यात आला.
प्रास्ताविक प्रा डॉ. तुकाराम फिसफिसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा डॉ. दिगंबर रोडे तर आभार प्रदर्शन प्रा. अनिल बडगुजर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमाचे महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाशराव सोळंके, सचिव सतीशराव चव्हाण व प्राचार्य बाळासाहेब जाधव यांनी कौतुक केले.