सोनपेठ : पाथरी तालुक्यातील ंिलबा येथील योगेश्वरी शुगर साखर कारखान्याच्या २३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज बुधवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी एम.टी.(नाना) देशमुख यांच्या हस्ते ११ वाजता होणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यावेळी एच.टी. देशमुख, जे.टी (भाऊ) देशमुख, आर.टी.(जिजा) देशमुख, संचालक राहुल देशमुख, डॉ. अभिजित देशमुख, कार्यकारी संचालक ऍड. रोहीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मागील २३ वर्षांपासून सतत गळीत हंगाम सुरू राहिला असल्याने सदरचा कारखाना शेतक-यांसाठी वरदान ठरत आहे. या कारखान्याची निर्मिती दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पेतून व कै.अशोकशेठ सामत यांच्या कुशल मार्गदर्शनातून करण्यात आली आहे.
माजी आ. आर.टी. (जिजा) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू असून मागील वर्षी कारखान्याने २ लाख ९२ हजार ४७ मेट्रिक टन गाळप केले असून मागील वर्षी कारखान्याने एक रक्कमी २७०० रुपये प्रति मेट्रिक टन दर देऊन शेतक-यांचे हीत जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर्षीसाठी कारखान्याच्या वतीने ३ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून पुढील गळीत हंगामात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने चार नवीन हार्वेस्टरची खरेदी करण्यात आली आहे. त्या माध्यमातून ऊस तोडणीसाठी मदत होणार आहे. या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.