21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआपणास सुरक्षिततेसाठी खूप काम करायचे

आपणास सुरक्षिततेसाठी खूप काम करायचे

 सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना केले मार्गदर्शन

पुणे : आपणास सुरक्षिततेसाठी खूप काम करायचे असून, ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारासह राज्यात अन्य ठिकाणी झालेल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने राज्यभर निषेध आंदोलन केले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुण्यात तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. यावेळी भर पावसात सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या आंदोलनात स्वत: शरद पवारांसह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. पाऊस सुरू असताना देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांना उद्देशून म्हणाल्या की, आपणास सुरक्षिततेसाठी मोठे गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. काल मी दौंडमध्ये गेले. त्या ठिकाणी घडलेली घटना पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे. आता लोक पुढे येत आहेत. त्यामुळे त्या पालकांना न्याय देण्याची गरज आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ देऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू. जोपर्यंत बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकार असंवेदनशील
दरम्यान, शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात बदलापूरमध्ये निषेध व्यक्त करणारे आंदोलक बाहेरचे होते, असे सरकारचे म्हणणे आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका करत लोक कोणीही असोत ते भारतीय होते आणि बदलापूरच्या लेकीसाठी एकत्र आले होते. हे सरकार असंवेदनशील आहे. इतके गलिच्छ सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही, अशी सडकून टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR