30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeसोलापूरवृद्धाचा खून केल्याप्रकरणी तरुणास जन्मठेप

वृद्धाचा खून केल्याप्रकरणी तरुणास जन्मठेप

सोलापूर : भांडण सोडवण्यास मध्ये पडलेल्या वृद्धाच्या डोक्यात लाकडी वाशा मारल्याने झालेल्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शिंदे यांनी सोडा विक्रेत्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सद्दाम ऊर्फ फरदीन अब्दुल गफूर शेख (वय २९, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर), असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात झालेल्या मारहाणीत आयूब हुसेनसाब उस्ताद (वय ६५, रा. ३८१, राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर), असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत गुलनाज वाहीद तांबोळी (वय २९, रा. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली होती.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी गुलनाज या घटनेच्या दिवशी २८ सप्टेंबर २०२० रोजीच्या पूर्वी आठ दिवसाअगोदर आई आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी सोलापुरात आलेली होती. घटनेदिवशी ती घराच्या बाहेर इतरांशी बोलत होती. यादरम्यान, आरोपी सद्दाम तेथे आला. त्याने ‘माझ्या पत्नीला तू काय सांगितले’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर तो त्याच्या घराकडे गेला. तेथून त्याने लाकडी वाशा आणून फिर्यादीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत लाकडी वाशाने फिर्यादीच्या डोक्यात मारले.हा प्रकार पाहून फिर्यादीचे वडील मयत आयूब हुसेनसाब उस्ताद (वय ६५) हे तेथे आले. त्यांनी आरोपीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला; परंतु चिडलेल्या आरोपीने त्यांच्याही डोक्यात लाकडी वाशाने प्रहार केला. यामुळे फिर्यादी आणि त्यांचे वडील आयीब हे दोघेही जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; परंतु गंभीर जखमी झाल्याने फिर्यादीचे वडील आयूब हे बेशुद्ध झाले होते. दरम्यान, त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला.

यादरम्यान आरोपीने घटनेच्या ठिकाणाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सदरच्या निर्घृणपणे मारहाणीत फिर्यादी व यातील मयत आयूब उस्ताद यास त्यांची काहीही चूक नसताना आरोपीने निव्वळ संशयावरून फिर्यादीस जबर मारहाण व शिवीगाळ केली व त्यावेळी फिर्यादीचे वडील आरोपीस समजावून सांगत असताना त्यांनासुद्धा रागाच्या भरात डोक्यात लाकडी वाशाने जबर मारहाण करून शिवीगाळ करत जिये ठार मारले आहे, असा युक्तिवाद सरकारच्या बाजूने करण्यात आला. या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एम. बी. सोलनकर यांनी काम पाहिले.

या खटल्यात सरकारतर्फे १३साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच, घटनास्थळाचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, यातील तपासिक अधिकारी व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर या सर्वांचे जबाब महत्त्वाचे ठरले.याबाबत गुलनाज तांबोळी यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत व सपोनि लोंढे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यामध्ये सरकार पक्ष व बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने वरील आरोपीला भा. दं. वि. ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR