मुंबई : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्रकारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून कोण लढणार असा प्रश्न केला. यावेळी आव्हाड यांनी युगेंद्र पवार यांच्या नावाचा उल्लेख केला. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, बारामती विधानसभेतून कदाचित मला असे वाटतेय की युगेंद्र पवार हे आमचे उमेदवार असतील. मला अजून याबाबतीत खात्री नाही असेही आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसने आज उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत ३८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. यामुळे आता त्यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढणार या चर्चा सुरू असून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराचे नाव सांगितले आहे.
गेल्या काही दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवारबारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे बोलले जात होते. आज उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, या चर्चांना आमदार जितेंद्र्र आव्हाड यांनी पूर्णविराम दिला आहे.