28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकींची उचलबांगडी

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकींची उचलबांगडी

मुंबई : काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. देशातील विविध राज्यांमधील पदाधिका-यांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. दिल्ली, गोवा, अंदमान-निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान हेदेखील काँग्रेस सोडतील, अशी चर्चा होती. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या बैठकांनाही उपस्थिती लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून झिशान यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता झिशान सिद्दीकी कधीपर्यंत काँग्रेसमध्ये थांबतात, हे पाहावे लागेल.

पूर्वीच्या कार्यक्रमात मला निमंत्रण नसायचे: झिशान सिद्दीकी
बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर झिशान सिद्दीकी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, यापूर्वी एक मुख्यमंत्री असे होते की, माझ्या ऑफिसजवळ कार्यक्रम ठेवायचे, पण त्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण नसायचं. मी त्यांना भेटायचो तेव्हा ही गोष्ट बोलून दाखवायचो. एकदा तर जाहीर भाषणातही मी त्यांना मलाही मतदारसंघातील कार्यक्रमांचे निमंत्रण देत जा, असे सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR