मुंबई : प्रतिनिधी
बदलापूर येथे ज्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती भाजपशी संबधित होती. त्यांना वाचवण्यासाठी बलात्काराचा आरोप असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांना सांगून एन्काऊंटर करण्यात आल्याचा खळबळनजक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आरोपी शिंदेने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या नाही तर त्याला पोलिसांनी मारले, हे आपण आधीच सांगितले होते, असा दावाही देशमुख यांनी केला.
बदलापूरच्या शाळेतील अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजले होते. सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतरही ते उघडकीस आले. शाळेत साफसफाई करणा-या अक्षय शिंदेला आरोपी बनवण्यात आल्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते. या दरम्यान शाळेच्या संचालकावरही संशय व्यक्त केला जात होता. आता न्यायदंडाधिकारी यांनी शिंदे यांने स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या हे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते, असा निष्कर्ष देण्यात आल्याने पुन्हा हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
अनिल देशमुखांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केला आहे. ज्या शाळेत चिमुलकीचे लैंगिक शोषण झाले ती शाळा भाजपच्या मंडळींची होती. त्यांना वाचवण्यासाठी शिंदेचा एन्काऊंटर करायला लावला काय ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. चिमुकलीवर अत्याचार अक्षय शिंदे यानेच केला अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याला अटकेनंतर पोलिसांनी घेऊन जात असताना अक्षय शिंदे यांनी पोलिसाचे रिवॉल्व्हर हिसकावून स्वत: गोळी झाडून मारून घेतले होत. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच वेळी आपल्याला संशय आला होता. तो बोलूनसुद्धा दाखवला होता.
पोलिसांच्याजवळ असलेले रिवॉल्व्हर काढून कोणी गोळ्या झाडू शकत नाही. ते लॉक असते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आपण केली होती. आपण व्यक्त केलेली शंका खरी ठरल्याचे न्यायदंडाधिका-याच्या निष्कर्षावरून दिसते, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
अक्षय शिंदेने ज्या बंदुकीने स्वत:ला मारून घेतले, त्यावर त्याचे फिंगरप्रिंट नव्हते. हा एन्काऊंटर कोणी केला? कोणाला सांगून केला? कोणाला वाचवण्यासाठी केला? हासुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, असे सांगून देशमुखांनी याविरोधात आणखी आवाज बुलंद करण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. या प्रकरणावरून आता महायुती सरकारला विरोधकांमार्फत घेरण्याची शक्यता आहे. हे प्रकरण घडले तेव्हा राज्यात महायुतीचेच सरकार होते.