25.7 C
Latur
Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाअखेरच्या षटकात भारताचा थरारक विजय

अखेरच्या षटकात भारताचा थरारक विजय

सेंच्युरियन : वृत्तसंस्था
तिलक वर्माचे तडाखेबंद शतक आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने टी-२० क्रिकेट मालिकेतील तिस-या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर २२० धावांचे लक्ष्य ठेवले. दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रीच क्लासिनने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि सामन्यात रंगत आणली होती. पण क्लासिन बाद झाला आणि त्यानंतर हा सामना भारताच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर मार्को जेन्सन जोरदार फटकेबाजी करत होता. अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने त्याला ५४ धावांवर बाद केले आणि भारताने ११ धावांनी सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

येथील सुपरस्पोर्ट्स पार्कवर ही लढत झाली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सलग दोन शतकानंतर गेल्या सामन्यात संजू सॅमसनला खाते उघडता आले नव्हते. मात्र, या वेळी तो कशी कामगिरी करतो, याबाबत उत्सुकता होती. मात्र, दुस-याच चेंडूवर जॉन्सनचा त्रिफळा उडाला. संजूला या सामन्यातही खाते उघडता आले नाही. मात्र, कर्णधार सूर्यकुमार यादवच्या आधी फलंदाजीस बढती मिळालेल्या तिलक वर्माने आपली छाप पाडली.

तिलकने अभिषेक वर्माच्या साथीने भारताला शतकी टप्पा पार करून दिला. त्यांनी ५२ चेंडूंतच १०७ धावांची भागीदारी रचली. केशव महाराजने अभिषेकला बाद करून ही जोडी फोडली. अभिषेकने २५ चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांसह ५० धावांची खेळी केली. त्यानंतर तिलकने एकबाजू लावून धरत भारताला दोनशे धावांचा टप्पा पार करून दिला. एक वेळ भारतीय संघ सव्वादोनशे धावांचा टप्पा पार करणार असे वाटत होते. मात्र, जॉन्सनच्या अखेरच्या षटकात भारतीय फलंदाजांना केवळ चारच धावा करता आल्या. तिलकने ५६ चेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांसह नाबाद १०७ धावांची संस्मरणीय कामगिरी केली. त्यामुळे विजय सुकर झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR