पुणे : प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांचा शपथविधी पार पडला. यामध्ये १२ पैकी ७ नेत्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली. यावर अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे शहराध्यक्षासह तब्बल ६०० जणांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, काल राज्पाल नियुक्त विधान परिषद आमदारांचा शपथविधी घाईघाईने आटोपला. अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर हे नाराज झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे, त्यांच्यासोबत पुणे शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल ६०० जणांनी राजीनामा दिला आहे. नुकतीच याबद्दल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.
मी २०१२ पासून पक्षाचे काम करतोय. गेले १४ महिने शहराध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवडी यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचे कारण काय? मला इतर माणसासारखं पुढे पुढे करता येत नाही. कार्यकर्त्यांनी स्वत:हून राजीनामे दिले आहेत. मी स्वत: राजीनामा देतो. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांबद्दल तत्परता दाखवली. ती आमच्याबद्दल का दाखवली नाही? असा प्रश्नही दीपक मानकर यांनी उपस्थित केला आहे.
भुजबळ साहेबांच्या घरात सगळी पदं दिली तर इतर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार, अशा शब्दांत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार?
आपली आणि शरद पवार साहेबांची भेट झालेली नाही.आपण केवळ जयंत पाटलांना भेटल्याचे यावेळी राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. आपण सध्या अजित पवार यांच्या गटात असलो तरी आपण आगामी निवडणूक शरद पवार गटातून लढवावी अशी आपल्या ९९ टक्के कार्यकर्त्यांची भूमिका आहे असे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे.