नवी दिल्ली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यावर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारात ‘एनडीए’तील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिंदेसेनेसह अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रिपद दिले जाणार असल्याचे समजते.
सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपदे वाढविण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालयेही दिली जातील, असे मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगण्यात येत आहे. सर्वाधिक नाराजी राष्ट्रवादी अजित पवार गटाने दर्शवली आहे. प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद न दिल्याने त्यांनी कोणतेही मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पटेल यांना मंत्रिपदासाठी सरकारचे १०० दिवस पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे श्ािंदेसेनेला आणखी एक मंत्रिपद मिळू शकते, तसेच प्रतापराव जाधव यांना कॅबिनेट मंत्री करण्याची त्यांची मागणीही पूर्ण होऊ शकते.
अधिवेशनात समन्वयक : संसदेच्या अधिवेशनादरम्यान एनडीएच्या समन्वयकाची निवड करण्यासह एनडीएची समन्वय समितीही स्थापन केली जाईल. एनडीएच्या समन्वयक पदासाठी टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू आणि जदयू नेते नितीश कुमार हे प्रमुख दावेदार आहेत. ही समिती मित्रपक्षांच्या समस्या सोडविण्याचे काम करेल.
चौकट
जदयू, टीडीपीला आणखी दोन मंत्रिपदे?
– मोदी मंत्रिमंडळाच्या सप्टेंबरमध्ये होणा-या विस्तारात जनता दल यू आणि तेलगू देसम पक्षाला आणखी दोन केंद्रीय मंत्रिपदे मिळू शकतात.
– पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी दिलेले १०० दिवसांचे हे आश्वासन सर्व मित्रपक्षांनी मान्य केले आहे.
– सरकारचे १०० दिवस पूर्ण होत असताना काही नवे पक्षही ‘एनडीए’त सामील होऊ शकतात. ‘बीजेडी’चाही त्यात समावेश होऊ शकतो.