गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये भाषण करताना विधानसभा निवडणुकांबाबत आश्चर्यजनक वक्तव्य केले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली असून यंदा बारामतीतील विधानसभा निवडणूक कोण लढणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
आता, महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवारच लढतील, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या परीने प्रचार करत आहेत. राजकीय यात्रा आणि दौ-यांच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचत आहेत. जयंत पाटील आज गोंदिया दौ-यावर असताना त्यांनी संवाद साधला.
त्यावेळी, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना बारामतीच्या जागेवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांना लक्ष्य केले. मी शरद पवारांना सोडून चूक केली असे वक्तव्य अजित पवारांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता, केले होते. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांनी काय बोलायचे यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वत:च्या बुद्धीने आणि स्वत:च्या इच्छेने ते बोलत नाहीत, त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार बोलतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
मविआला १७५ जागा मिळतील : जयंत पाटील
राज्यात होत असलेल्या आगामी विधानसभा निवडणूक सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला १५५ जागा मिळत असल्याचा अंदाज आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की ह्या जागा वाढून १७५ पर्यंत जागा आम्हाला मिळतील. तर, अजित पवार हे बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.