अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले. सहा महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत.
अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अशा चर्चांना उधाण असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी रांगोळीच्या माध्यमातून २०२४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना बनविण्याचा संकल्प केला आहे.
दरम्यान, अकोल्यातील एका कलाकाराने अजित पवार यांचे चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले असून त्याखाली ‘मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की ‘लवकरच २०२४ ’ असा सूचक संदेश लिहाण्यात आला आहे. या रांगोळीचा व्हिडीओ अमोल मिटकरींनी शेअर करत त्याखाली कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
ज्यामध्ये लिहिले आहे की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही सर्वसामान्यांची भावना आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू. या संकल्पासह ‘घड्याळ तेच, वेळ नवी’ आणि ‘अजितपर्व’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी वापरला आहे. अजित पवार यांना २०२४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणे हा संकल्प या रांगोळीद्वारे जाहीर करण्यात आला आहे.