अमित शाह यांची गुप्त भेट, मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यांच्या या भेटीबद्दल बरीच गुप्तता पाळण्यात आली होती. सध्याच्या राज्यात सुरु असलेल्या तीन महत्त्वाच्या घडामोडींबद्दल या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. त्यासाठीच अजित पवार शहांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावर शहांचे शासकीय निवासस्थान आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा विषय सध्या राज्यात गाजत आहे. विरोधकांसह सत्ताधा-यांनीदेखील देशमुख यांच्या हत्येचा विषय उचलून धरला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमध्ये अटकेत आहेत. मुंडे मंत्रिमंडळात असल्याने कराड यांची निष्पक्ष चौकशी होणार नाही, असा सत्ताधारी आमदारांचाही दावा आहे. भाजप आमदार सुरेश धस सातत्याने मुंडे आणि कराड यांना लक्ष्य करत आहेत.
राज्यात कॅबिनेटचा विस्तार होण्यापूर्वीच देशमुख हत्या प्रकरण समोर आले आहे. त्यात कराडचा सहभाग असल्याचे आरोप झाले. ११ डिसेंबरला कराडविरोधात खंडणी प्रकरणात आरोप झाले. त्यानंतर १५ डिसेंबरला झालेल्या कॅबिनेट विस्तारात मुंडेंना स्थान देण्यात आले. राज्यात सत्ता आल्यानंतर सरपंच हत्या प्रकरणामुळे महायुती बॅकफूटवर गेलेली आहे. मुंडे यांच्यामुळे सरकारवरच नामुष्की ओढवल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळे या विषयावर पवार आणि शहांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिल्लीहून परतल्यावर पवार काय निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पालकमंत्रिपदावरूनही चर्चेची शक्यता
राज्यात पालकमंत्रिपदाचा विषयदेखील रखडलेला आहे. सरकार अस्तित्त्वात येऊन महिना उलटला तरीही अद्याप पालकमंत्री ठरलेले नाहीत. काही जिल्ह्यांवर दोन-दोन पक्षांचा दावा असल्याने पालकमंत्रिपदाचा विषय प्रतिष्ठाचा झालेला आहे. त्यामुळे अजित पवार यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांचे खासदार
गळाला लावण्याचा प्रयत्न?
अजित पवार दिल्लीत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या घरी थांबले. तिकडून ते अमित शाह यांच्या भेटीला गेले. पण त्या भेटीबद्दल पाळण्यात आलेली गुप्तता चर्चेत आहे. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार गळाला लावण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून संपर्क केले जात असल्याचे दावे शरद पवारांच्या खासदारांकडून केले जात आहेत. यासंदर्भातदेखील चर्चा होऊ शकते.