नागपूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात नागपूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा काँग्रेस पक्ष प्रवेश झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. या निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. तरीही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळींचा पक्षप्रवेश होताना दिसत आहे. असे असताना राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच राज्यभरात विविध पक्षांचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलच्या सरचिटणीस कल्पना मानकर, धनराज फुसे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद ढंगरे यांच्या नेतृत्वात राजकुमार जी. वानखेडे, योगेश धनराज फुसे, राजेश कुहीकर, राधेश्याम म्हात्रे, ज्योती सोमकुंवर, संदीप वानखेडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतिशील सरकार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. महाराष्ट्रात केवळ काँग्रेसच्या नेतृत्वातच प्रगतिशील, स्थिर व मजबूत सरकार मिळू शकते, असे मनोगत प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.