मुंबई : प्रतिनिधी
महायुतीमधील घटक पक्षातील नेते अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यामध्ये सारे काही आलबेल नसल्याच्या देखील चर्चा एका बाजूला सुरू आहेत. तर आगामी विधानसभेसाठी गुलाबी रंगामध्ये जनसन्मान यात्रा काढून अजित पवार यांचा प्रचार देखील सुरू आहे. मात्र मित्रपक्षच अजित पवारांना महायुतीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचा आढावा घेण्याचे काम आयोग करत असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले असून नेत्यांमध्ये राजकीय वाक्युद्ध सुरू आहे. आरोप- प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. मात्र यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू आहेत.
अजित पवार यांच्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अजित पवार पुन्हा एकदा वेगळा विचार करणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र अजित पवारांना या चर्चांवर नाही म्हणत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
आता मात्र यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्रपक्षांमार्फत सुरू आहेत. कोणी थेट आरोप करतो तर कोणी बॅनर फाडत आहे. जेवढे दुखवता येईल तेवढे जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. अपमान केला जात आहे. जखम मोठी झाली की आपोआप माणसे दूर होतात,’’ असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केला.
जो कमजोर दुवा असतो त्याला बाजूला केले जाते
पुढे ते म्हणाले की, अजित पवार यांचे बॅनर फाडले जातात, बारामतीमध्ये बॅनरवर काळा पडदा टाकला जातो, बारामतीत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी एकदाही मुख्यमंत्र्यांकडे बघितले नाही. सर्वांचे चेहरे पडले होते. हे महायुतीच्या परतीच्या प्रवासाची लक्षणे आहेत. श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये जो कमजोर दुवा असतो त्याला बाजूला केले जाते. तसेच प्रयत्न सध्या महायुतीमध्ये सुरू असल्याचे दिसून येते. पहिला नंबर अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर एकनाथ शिंदेंचाही असू शकतो, असे राजकीय भाकित विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून अनेक नेते पाठविले आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवला जात आहे. अधिकार कमी केले जात आहेत. सध्या त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे हायकमांडतर्फे केले जात आहे. मोदी-शहा जोडीला माणूस उपयुक्त वाटत नसेल तर बाजूला सारण्याचे त्यांची पद्धत आहे. हिंदुत्व हा विचार आहे. त्याला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न होऊ नये. लोकशाहीमध्ये हिंदू, मुस्लिम, दलित असा भेद करता येणार नाही. शिवसेना जर मुस्लिम उमेदवार देत असेल तर त्यात काही वावगे नाही, ते लोकशाहीला मानतात, संविधानाला मानतात,’’ असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.