24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमाजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ््या घालून हत्या

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ््या घालून हत्या

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच बांद्रा पूर्वेत खेरवाडी परिसरात ही घटना घडली आहे. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ््या झाडल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोरच ही घटना घडली. तोंडाला रुमाल बांधून तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून दोघांना अटक केली आहे. बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. या गोळीबाराने मुंबईत खळबळ उडाली आहे. लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. त्या अगोदर एका राजकीय नेत्याची हत्या झाल्याने याचे राजकारण होणार आहे.

लिलावती रुग्णालयाच्या परिसरात आणि वांद्रे पूर्व परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू झाला आहे. बाबा सिद्दिकी हे वांद्रे पूर्व परिसरातील बडे नेते असून त्यांनी राज्याचे मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून आमदार आहेत. लोकसभेच्या आधी बाबा सिद्दिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दिकी हे मुंबईतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत.

अजित पवार गटात
केला होता प्रवेश
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी कॉंग्रेस पक्षामधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत. तेही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR