जरांगे पाटील यांचा इशारा
बीड : प्रतिनिधी
राज्यात आपल्या समाजावर अन्याय होणार असेल तर आपल्याला उठाव करावाच लागेल. यावेळी आपल्याला उलथापालथ करावीच लागेल, अशा शब्दांत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात हुंकार भरला.
यावेळी जरांगे पाटील यांनी समाजावर अन्याय होणार असल्यास शांत बसणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. आता लढायला शिका. हिंदू धर्माने अन्यायाविरोधात लढायला शिकवले. अन्याय होत असेल तर उठाव करायचा, हेही संविधानाने शिकवले. आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळावा, म्हणून उठाव सुरू आहे. आम्ही १४ महिन्यांपासून आरक्षणासाठी झुंजत आहोत, यापुढेही लढा सुरूच राहील, असे जरांगे पाटील म्हणाले. मला संपविण्यासाठी षड्यंत्र रचले. तरीही मी थांबणार नाही, असे ते म्हणाले.
मला संपविण्यासाठी
षड्यंत्र रचले गेले
मला संपवण्यासाठी अनेक षड्यंत्र रचण्यात आले. मला पूर्ण घेरले. मी या गडावरून एकही शब्द खोटे बोलणार नाही. मला होणा-या वेदना माझ्या समाजाला सहन होत नाहीत. समाजाला होणा-या वेदना मलाही सहन होत नाहीत. त्यामुळे समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे लढा तीव्र केला जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.