वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेने भारताला सोनोबॉयची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. सोनोबॉय हे अॅँटी सबमरीन उपकरण आहे. त्यामुळे सागरात भारताची ताकद वाढणार आहे. भारताला हे उपकरण खरेदीसाठी अंदाजित ५२.८ मिलियन डॉलरचा खर्च येणार आहे. या उपकरणाच्या मदतीने भारतीय नौदलाला सहजतेने आपल्या समुद्र क्षेत्रातील शत्रुच्या पाणबुड्या शोधून काढता येतील.
भारताला होणा-या सोनोबॉयच्या विक्रीबद्दल काँग्रेसला सूचित करण्यात आले आहे, असे अमेरिकेच्या संरक्षण सहकार्य एजन्सीने सांगितले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौ-यादरम्यान भारताला हे यश मिळाले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत बनवण्यासाठी पेंटागनशी चर्चा केली. या दरम्यान संरक्षण सहकार्य, क्षेत्रीय सुरक्षा, औद्योगिक सहकार्य, भारत-प्रशांत क्षेत्र आणि अन्य महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली. त्याचवेळी ही अॅँटी सबमरीन वारफेयर सोनोबॉयच्या खरेदीचा करार झाला.
सोनोबॉय एक पोर्टेबल ‘सोनार’ सिस्टिम आहे. सोनार म्हणजे साऊंड नेविगेशन अॅँड रेज्ािंग सिस्टमच्या मदतीने लांबच्या कुठल्या वस्तुची माहिती मिळवणे. ही वस्तू किती लांब आहे? त्याची स्थिती, दिशा याची माहिती मिळवली जाते. त्यासाठी साऊंड वेव्जची मदत घेतली जाते. या सिस्टमद्वारे पाण्यात साऊंड वेव्ज सोडल्या जातात. त्यांच्या मार्गात एखादी वस्तू आली तर त्याला धडकून इको म्हणजे (प्रतिध्वनी) येतो. या साऊंड वेव्ज सोडल्यानंतर त्यांना परत यायला किती वेळ लागतो? यावरुन वस्तू किती लांब आहे ते समजते.
‘सोनोबॉय’ची खासियत……
सोनोबॉय जवळपास तीन फुट लांब आणि पाच इंच व्यासाची सोनार सिस्टिम आहे. याची खासियत ही आहे की, पाणबुडी शोधण्यासाठी जहाज, हेलीकॉप्टर, विमान, युद्धनौका आणि पाणबुडीवरुन समुद्रात सोनोबॉयला टाकले जाते. सोनाबॉय एक्टिव, पॅसिव आणि स्पेशल पर्पज असे तीन प्रकारचे असते.