अॅटलांटा : वृत्तसंस्था
अमेरिकेत शुक्रवारी आलेल्या हेलेन चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ राज्यांमध्ये 49 लोकांचा मृत्यू झाला आहे, अमेरिकन मीडिया हाऊस सीएनएनच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आलेल्या पुरात अनेक घरे कोसळली आहेत.
चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव दक्षिण कॅरोलिना आणि जॉर्जियामध्ये दिसून आला जेथे श्रेणी ४ च्या वादळामुळे ३४ लोकांचा मृत्यू झाला. पाचही राज्यांमध्ये वादळामुळे अनेक लोक अडकले असून, त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर कॅरोलिनामध्ये काही ठिकाणी भूस्खलनही झाले. लोकांना वाचवण्यासाठी येथे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले.
या काळात रुग्णालयाच्या छतावरून जवळपास ५९ जणांची सुटका करण्यात आली. अमेरिकेतील वादळामुळे ४५ लाख लोकांच्या घरात वीजपुरवठा नाही. फ्लोरिडामध्ये बचाव कार्यासाठी ४,००० नॅशनल गाडर््समन तैनात करण्यात आले आहेत.
२.५१ लाख कोटी रुपयांचे नुकसान
आर्थिक कंपनी मूडीजने सांगितले की, हेलेन चक्रीवादळामुळे देशभरात २ लाख ५१ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकोच्या आखातातून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर धडकणारे हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ ठरले.
अमेरिकेच्या इतिहासातील १४ सर्वात धोकादायक वादळांपैकी एक आहे. याआधी शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार १ कोटी २० लाख लोकांना वादळाचा फटका बसला. त्यामुळे १ हजार उड्डाणे रद्द करण्यात आली. राज्य आपत्कालीन सेवेने सांगितले होते की, येत्या दोन ते तीन दिवसांत ५ कोटी लोकांना याचा फटका बसू शकतो.