पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलपूर्वी केवळ काही ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर आता भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
तिने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. विनेश फोगट हिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, आई कुस्ती माझ्याविरुद्ध जिंकली. तुमचे स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. आता माझ्यात जास्त ताकद नाही. ‘अलविदा कुस्ती’ अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
विनेश फोगटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपान्त्य फेरीचा सामना ५-० च्या फरकाने जिंकला आणि ऑलिम्पिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. पहिल्या दिवशी विनेशचे वजन ४९.५ इतके भरले. मात्र, उपान्त्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन ५२ किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अपूर्ण राहिली.
पराभव झाला नाही, पराभूत केले : पुनिया
आता विनेशच्या या घोषणेनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले, विनेश, तुझा पराभव झाला नाही तुला पराभूत केले गेले, आमच्यासाठी तू नेहमीच विजेती राहशील, तू भारत कन्या आहेस तसेच भारताचा अभिमान आहेस.
विनेश फोगटला जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले, त्यानंतर तिने कोर्ट ऑफ एब्रीट्रेशन फॉर स्पोर्टच्या न्यायालयात अपील केले होते. या स्पर्धेसाठी तिला रौप्य पदक देण्यात यावे, असे विनेशने सांगितले होते.