बीडमध्ये गारपीट, परभणी, लातूर, हिंगोलीत विजांच्या कडकडाटासह पाऊस
लातूर/बीड/हिंगोली
बीड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने पिके, भाजीपाला, फळझाडांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक ठिकाणी तर वादळामुळे आंब्याच्या कै-यांचा सडा पडला आहे. त्यामुळे आंबे, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. बीडमध्ये तर आज गारपीट झाली. त्यामुळे मोठी हानी झाली आहे.
मराठवाड्यात काही भागांत अवकाळीने रोज धडाका सुरू केला आहे. लातूरमध्ये मागील ४ दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. विजांचा कडकडाट, वादळी वा-यामुळे मोठी हानी होत असून, काही भागांत गारपीट झाल्याने उन्हाळी पिके, फळबागांचे नुकसान झाले. त्यातच शिरुर अनंतपाळसह औसा तालुक्यात वीज पडून जनावरे दगावली. जळकोट तालुक्यातही अवकाळीने मोठी हानी झाली. परभणी जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा धडाका सुरू आहे. काल वीज पडून मनुष्यहानी आणि जनावरेही दगावली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यात ब-याच भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यासोबतच हिंगोली जिल्ह्यातही वादळी वा-यासह पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले. वादळी तडाख्यात काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेली, तर झाडे उन्मळून पडल्याने मोठी हानी झाली. तसेच विजेचे खांबही पडले.
बीड जिल्ह्यात आज सलग दुस-या दिवशी अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे आंबा, टरबूज यांच्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करण्याची मागणी शेतक-यांनी केली. वडवणी तालुक्यात गारपिटीमुळे उन्हाळी बाजरी जमीनदोस्त झाली तर टरबूज पिकाचेही मोठे नुकसान झाले.
बीड जिल्ह्यात गारपीट
बीड जिल्ह्यातील गेवराई, धारूर, वडवणी, परळी यासह अनेक तालुक्यांत गारपीट विजांचा कडकडाट आणि वादळीवा-यासह अतोनात नुकसान झाले आहे. या वादळी वा-यामुळे अनेक जनावरांनादेखील गंभीर दुखापत झाली आहे. गेवराई तालुक्यातील शिरसमार्गे येथे वादळी वारा आणि गारांमुळे अनेक जनावरांना दुखापत झाली. परळीत ज्वारी, बाजरीचे अतोनात नुकसान झाले तर परळीसह जिल्ह्यात आंब्याच्या फळझाडांसह कै-यांचे मोठ्या प्रमाणात हानी झाली.