नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून तेथील यंत्रणांनी घुसखोरांना शोधण्यास सुरुवात केली आहे. मेक्सिकोसारख्या शेजारी देशातील लोकांना अमेरिकेने विमानाने परत पाठविले होते. तिथे या विमानांना उतरण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, अखेर ट्रम्प यांनी धमक्या दिल्यानंतर मेक्सिकन सरकारने या घुसखोरांना माघारी घेण्यास होकार दिला होता. अशाच प्रकारे आज २०० भारतीय घुसखोरांना घेऊन अमेरिकेच्या हवाई दलाचे विमान भारताकडे येण्यासाठी निघाले आहे.
अमेरिकेत जे लोक कोणत्याही कागदपत्रांशिवाय राहत आहेत. अशा लोकांना पकडून त्यांच्या देशात परत पाठविण्यात येत आहे. हा सर्व खर्च अमेरिकाच करत आहे. आज २०५ भारतीयांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान भारताच्या दिशेने झेपावले आहे.
अमेरिकेचे सी-१७ हे विमान या अवैध लोकांना घेऊन निघाल्याचे एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर प्रसारमाध्यमांना कळविले आहे. १८ हजार पेक्षा जास्त भारतीय लोक अमेरिकेत अवैधरित्या राहत आहेत. या लोकांचा व्हिसा संपला आहे किंवा ते अवैधरित्या अमेरिकेत दाखल झाले आहेत. टेक्सासमधील एल पासो आणि कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो येथून ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत.