मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी भिडे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयात भिडे यांची नियुक्ती करून प्रशासनातील मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी दुस-या दिवशी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती केली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयात आणखी कोणते सनदी अधिकारी रुजू होणार याविषयी प्रशासकीय वर्तुळात उत्सुकता होती. आज अखेर भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी ब्रिजेश सिंह यांच्या जागी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. भिडे या १९९५ च्या तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. मुंबई महापालिकेत त्यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. राज्य सरकारने पुढील आदेश होईपर्यंत भिडे यांच्याकडील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा कार्यभार कायम ठेवला आहे.
प्रशासनात मोठ्या
फेरबदलाचे संकेत
राज्य विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. विशेषत: म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, एमएमआरडीएसह पुणे, ठाणे, नागपूर महापालिकांच्या प्रमुखपदी नवे चेहरे दिले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्रालयात प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव स्तरावर मोठे फेरबदल अपेक्षित आहेत.