आर्थिक व वैश्विक महाशक्ती बनण्याचे स्वप्न बाळगणा-या भारतासमोर अस्वस्थ शेजा-यांची समस्या ‘आ’ वासून उभी आहे. त्यात ज्या बांगला देशाबरोबर भारताचे सलोख्याचे संबंध आहेत तिथे आता आगडोंब उसळला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू झालेल्या आंदोलन व हिंसाचाराचा शेवट बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडण्यास भाग पाडणारा व या देशात लष्करशाहीचा उदय करणारा ठरला आहे. एका भूतानचा अपवाद वगळता नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, अफगाणिस्तान या सर्व भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अस्वस्थता व अशांतता निर्माण झाली आहे व त्यामुळे या देशांमधील लोकशाही व्यवस्थेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
कमालीचे अस्थिर बनलेल्या देशांच्या यादीत आता बांगलादेश पहिल्या क्रमांकावर गेला आहे. बांगलादेशातील हे अराजक आता कोणते वळण घेणार याची भारतासह जगाला चिंता करावी लागणार आहे. ही सगळी परिस्थिती निर्माण होण्यास निमित्त ठरले ते सरकारी नोकरीत स्वातंत्र्यासाठी लढणा-यांना आरक्षण देण्याचा मुद्दा! या आरक्षण कायद्याची मुदत दोन वर्षांपूर्वी संपल्यावर हे आरक्षण रद्द करावे वा कमी करावे, अशी मागणी होत होती. शेख हसीना यांनी ही मागणी गांभीर्याने न घेतल्याने देशात असंतोष निर्माण झाला. विद्यार्थ्यांनी या आरक्षणविरोधात ‘स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ चळवळ सुरू केली. चर्चेद्वारे या मुद्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न शेख हसीना यांनी टाळल्याने असंतोषाचा भडका उडाला. गेल्या १ जुलैपासून हे आंदोलन पेटले. निदर्शकांवर लाठीमार, गोळीबार करण्यात आला. त्यात सहा जण ठार झाले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंबंधी निकाल दिला. एकूण ५६ टक्के आरक्षणापैकी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना ५ टक्के आणि दिव्यांग, आदिवासी, तृतीयपंथीयांना एक टक्का आरक्षण ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. खरे तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा मुद्दा संपुष्टात येऊन शांतता निर्माण व्हायला हवी होती.
मात्र, शेख हसीना यांनी हे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले नसल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. शेख हसीना यांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेले हे आंदोलन मोडून काढण्यासाठी अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. त्यातून सुरू झालेल्या संघर्षात ९१ जणांचा बळी गेला. त्यामुळे लष्कराला या प्रकारात हस्तक्षेप करण्याची वेळ आली. रविवारच्या हिंसाचारानंतर आक्रमक झालेल्या शेख हसीना सरकारने संपूर्ण देशभर तीन दिवसांची सार्वजनिक सुटी जाहीर करत संचारबंदी लागू केली. त्यामुळे संतापाचा विस्फोट झालेल्या आंदोलकांनी रस्त्यावर उतरत थेट शेख हसीना यांच्या शासकीय निवासस्थानावर व संसदेच्या इमारतीवर हल्लाबोल केला. लष्कराने हस्तक्षेप करून शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे व त्या देश सोडून गेल्याचे जाहीर केले. ४८ तासांमध्ये अंतरिम सरकारची स्थापना करण्याची घोषणाही लष्करप्रमुखांनी केली आहे. थोडक्यात निष्कर्ष हाच की, बांगलादेशाची सूत्रे आता लष्कराच्या हाती गेली आहेत.
आता हा देश कायमचा लष्करशाहीच्या विळख्यात सापडतो की, सगळे राजकीय पक्ष सामंजस्य दाखवून देशातील लोकशाहीचा गाडा सुरळीत करतात, हे लवकरच कळेल! सध्या तरी बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी सगळी सूत्रे हाती घेतली आहेत व देशात लष्करशाहीचा उदय झालेला आहे. हे होणेही अटळच होते. विरोधी पक्षांनी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घातल्यानंतरही शेख हसीना यांनी देशातील निवडणूक पार पाडली व तिस-यांदा पंतप्रधानपदी त्या विराजमान झाल्या. साहजिकच त्यामुळे अगोदरच मोठी राजकीय अस्वस्थता होती. ही अस्वस्थता बाहेर पडण्यास आरक्षणाचा मुद्दा निमित्त ठरला, असेच दिसते! कारण न्यायालयाच्या निकालानंतरही शेख हसीना यांच्या विरोधातील आंदोलन शमले नाही. त्यामुळे शेजारी चीनने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या मदतीने शेख हसीनांची राजवट उलथवून टाकण्याची स्क्रीप्ट लिहिली व ती विरोधी पक्ष आणि देशातील कट्टरतावादी संघटनांच्या मदतीने तडीस नेली, अशी शंका व्यक्त केली जाते आहे.
विखारी विस्तारवादी चीनचे मनसुबे व त्यांच्या ताटाखालचे मांजर बनून सुरू असलेला पाकिस्तानचा कारभार पाहता ही शंका नक्कीच अतर्क्य नाही. चीनने असाच प्रयोग श्रीलंकेतही केलेला आहेच! त्यामुळे हा अस्वस्थ शेजार भारतासाठी दुहेरी संकट आहे. शेख हसीना यांना भारत मित्र वाटत असला तरी बांगलादेशात सत्तेवर येणा-या नव्या सरकारलाही भारत मित्र वाटतो की शत्रू? हा मुद्दा भारतासाठी कळीचा ठरणार आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगचे धोरण उदारमतवादी होते. त्याविरुद्धच देशात संतापाचा उद्रेक झाला. त्याचा फायदा बांगलादेशातील कट्टरतावादी शक्ती उचलण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. त्यात या शक्तींना यश मिळाले तर बांगलादेशचा अफगाणिस्तान व्हायला फारसा वेळ लागणार नाहीच! ही परिस्थिती भारतासाठी त्रासदायकच ठरणारी आहे. अगोदरच बांगलादेशी घुसखोरांमुळे ईशान्य भारत अस्वस्थ आहे. अनेक वर्षे ही राज्ये जळत होती.
आता बांगलादेशातील अराजकाचा तातडीचा परिणाम भारताच्या सीमावर्ती राज्यांना भोगावा लागणार आहे. हे वास्तव लक्षात घेता बांगलादेशाचा गाडा लवकरात लवकर सुरळीत होईल व या देशाशी भारताचे संबंध सलोख्याचेच राहतील यासाठी भारताला सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. बांगला देशात जे घडते आहे तो त्या देशाचा अंतर्गत प्रश्न, ही भूमिका आता भारताच्या फायद्याची ठरणार नाही. देशाची सत्ता हाती घेणारे सर्वच लष्करशहा सुरुवातीला लोकशाही व्यवस्थेचे गोडवे गातात. मात्र, नंतर त्यांना सत्तेचा मोह सुटत नाही व त्यातून हुकूमशहा जन्माला येतात हाच जगातला आजवरचा इतिहास आहे. तो लक्षात घेता भारताला व जगाला आणखी एक देश लष्करशाहीच्या पाशात अडकणार नाही यासाठी गांभीर्याने व सक्रियपणे प्रयत्न करावे लागतील! शेवटी अस्वस्थ शेजार हा स्वत:बरोबरच शेजा-याचेही नुकसान करतोच, हे वास्तव भारताला कायम ध्यानात ठेवावेच लागेल, हे मात्र निश्चित!