निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील आंबेगाव येथे शेतात मशागतीत व्यस्त असलेल्या एका तरुण शेतक-याच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. ७ जून रोजी सायंकाळी घडली असून तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. निलंगा तालुक्यातील निटूर सज्जातील गोविंद नगर शिवारात आंबेगाव येथील शेतकरी शिवाजी जाधव यांची शेती आहे. दि. ७ जून रोजी सकाळी ते शेतामध्ये नांगरणी करत होते.
सायंकाळच्या सुमारास अचानक वीजांचा कडकडाट सुरू झाला काही समजण्याच्या आतच नांगरणी करत असलेल्या शिवाजी सुभाष जाधव वय ३२ वर्ष यांच्या अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, ३ वर्षांची मुलगी व १ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. आज घटनास्थळी जाऊन निटूर पोलीस चौकीचे जमादार सुधीर शिंदे, पोलीस टिपराळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय दवाखान्यात पाठविण्यात आला.