उदगीर : बबन कांबळे
उदगीर व पसिरात दुषीत हवामानामुळे फटका अंब्याच्या मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर बसत असून याचा उत्पादनावर विपरित परिणाम बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुरशीजन्य रोगामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. उदगीर तालुक्यातील सर्वच भागात बागायती क्षेत्र वाढत आहे. बागायतीमध्ये सर्वाधीक खात्रीशीर, कमी वेळेत व मर्यादित व्यवस्थापनात उत्पादन देणारी बाग म्हणून आंब्याला पहिली पंसती दिली जाते. दीर्घकाळ उत्पादन, प्रतिकिलो पन्नास रुपयापर्यंतचा बाजारभाव, उत्पादन प्रक्रीया सुलभ, पहिल्या दहा वर्षात अंतरपीक घेणे शक्य असल्यामुळे तालुक्यातील डोंगराळ पट्यात आंबा बागायती क्षेत्र वाढले आहे.
यावर्षी आंबा बागांना वेळेत मोहोर सुर झाला मात्र वादळामुळे वातावरणात मोठा बदल होऊन त्याचा फटका मोहाराला बसला आहे. सततचे ढगाळ आणि पावसाळी वातावरण हवेत आद्रतेचे वाढलेले प्रमाण पहाटेचे दाट धुके, दिवसभर कडक उन्ह आणि पहाटेच्या वेळेची थंडी या बदलत्या वातावरणात आंबा मोहोराला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जानवत आहे.
पावसाळ्यात मोहोर येण्याची प्रक्रिया सुरूच राहते. यावर्षी पावसाने मोठा खंड दिल्याने झाडांची पालवी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत पक्व झाली असून आंब्याच्या फुटव्यात काडी तयार झाल्याने मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक झाडे मोहोराने लगडलेली दिसत आहेत. पाऊस थांबला की झाडाची पालवी पक्व होऊन मोहोर येण्यास किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो मात्र यंदा परतीचा मान्सून तर बरसलाच नाही व पावसाचे प्रमाणही अत्यल्प राहिल्याने मोहोराच्या प्रक्रियेस लवकरच सुरू झाली आहे.