राजुरी : प्रतिनिधी
शरद पवारांना सोडून तिकडे जाणा-यांनी स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे. सोयीप्रमाणे शरद पवारांचा फोटो लावायचा नाही. ते मी खपवून घेणार नाही. न्यायालयाचे आदेश असतानाही शरद पवारांचा फोटो वापरल्याचे पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार अतुल बेनके यांना नाव न घेता दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्या प्रचार सभेत सुप्रिया सुळे यांनी बेनके यांच्यावर टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीने हा देश चालणारा नाही, हा देश शाहू, फुले यांच्या विचाराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा देश आहे. शरद पवार यांना या वयात काहीही नको आहे, ते कष्टकरी शेतक-यांना हमीभाव देण्यासाठी लढत आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आल्यानंतर पाच वर्षांत महागाई स्थिर ठेवण्यात येईल, महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी ३ हजार रुपये देणार येणार. कुकडी प्रकल्पातील पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण सुरू असल्याने सत्यशील शेरकर आमदार झाल्यावर जुन्नर ते धाराशिवपर्यंतच्या सर्व आमदारांची एकत्र बैठक घेऊन पाण्याचे सामान वाटप करू व पाण्याचा प्रश्न सोडविला जाईल. मतदारांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार : शेरकर
केंद्र शासनाच्या जीएमआरटी या अतिमहत्त्वाच्या प्रकल्पामुळे जुन्नर तालुक्यात रोजगारनिर्मितीवर अतिशय मर्यादा येतात. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांसाठी शासनाकडून भरीव निधी आणून मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.