शेतकरीराजा ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो त्या मान्सूनराजाचे अंदमानमध्ये आगमन झाले आहे. हवामान खात्याने नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अंदमानात दाखल झाल्याची खबरबात रविवारी दिली. उन्हाच्या चटक्यांनी होरपळून निघालेल्या आणि पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकणा-या जनतेवर मान्सूनच्या बातमीने आनंदाचा शिडकावा झाला आहे. गतवर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाण्याची टंचाई जाणवत आहे त्यामुळे यंदाच्या मान्सूनच्या वाटचालीकडे प्रत्येकाचे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची दिलासा देणारी बातमी दिली. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनने पुढे वाटचाल सुरू केली.
अंदमानात दाखल झालेला मान्सून केरळमध्ये शुक्रवारपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता मान्सूनची वाटचाल केरळकडे सुरू होईल. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वा-यांना केरळपर्यंत पोहोचण्यासाठी १० दिवस लागतात. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर तो ३१ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. मान्सूनपूर्व पाऊस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात होतो म्हणून तेथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारताच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या मान्सूनचे रविवारी निकोबार बेटावर थाटात आगमन झाले. त्याने देशाचा दुर्गम दक्षिण भागही व्यापला आहे. आता तो मालदीव, कोमोरिन आणि बंगालच्या उपसागरातील काही भाग उर्वरित निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्राकडे वेगाने वाटचाल करीत आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. साधारणपणे २२ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो मात्र, यंदा त्याने तीन दिवस आधीच या भागात धडक मारली आहे. २४ मेपर्यंत मान्सून संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापेल.
गत काही दिवसांपासून उष्णतेच्या प्रखर लाटांनी संपूर्ण देश होरपळून निघाला आहे. शुक्रवारी दिल्लीतील नजफगड येथे ४७ अंश इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. गत ८० वर्षातील हे विक्रमी तापमान होते. हवामान विभागाने या पूर्वीच देशात मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होईल तसेच ‘ला निना’ हा घटक सक्रीय होणार असल्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवास लहरीपणाचा असल्याचेच दिसून येते. गत १५० वर्षापासून मान्सूनचा लहरीपणा वारंवार दिसून आला आहे. कधी तो फार आधी तर कधी अतिशय उशिरा केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा मान्सून ९ ते १६ जूनदरम्यान महाराष्ट्रात, २५ जून रोजी राजस्थान आणि ६ जुलैपर्यंत मध्य प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. राज्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू असून ब-याच ठिकाणी ढगांचा गडगडाट, गारा, वादळी वा-यासह पाऊस पडत आहे. २३ मेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा चटका वाढला आहे. ‘ला निना’ या वातावरणीय परिस्थितीमुळे मोसमी वा-यांनी जोरदार आगेकूच ठेवली आहे. ३१ मेपर्यंत देशाच्या मुख्य भूमीवर पाऊस पोहोचेल, असा अंदाज आहे. देशातील ५२ टक्के शेती ही खरिपाची असते.
पाऊस लवकर आणि चांगला झाला तर ही शेती बहरते. केरळमधून साधारणत: आठवडाभराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोसमी पाऊस राज्यात प्रवेश करतो. ‘ला निना’च्या प्रभावामुळे यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असून तो ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत टिकेल, असा अंदाज आहे. ‘एल निनो’ आणि ‘ला निना’ या हवामानाच्या दोन परिस्थितींचा परिणाम पावसावर होतो. गतवर्षी ‘एल निनो’ सक्रिय होता त्यामुळे सरासरीहून कमी म्हणजे ९४ टक्केच पाऊस झाला होता. यंदा त्याचा प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे येत्या ३ ते ५ आठवड्यात ‘ला निना’ची स्थिती निर्माण होणे शक्य आहे. यंदा मान्सून वा-यांची अनुकूलता, त्याचा वेग या बाबी खूप सकारात्मक आहे. उत्तर प्रदेशात १८ ते २५ जूनपर्यंत तर बिहार-झारखंडमध्ये १८ जूनपर्यंत मान्सून पोहोचेल असा अंदाज आहे. देशात मे महिन्यातील कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमान प्रचंड वाढले आहे. उत्तर भारतात तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास गतवर्षी उशीर झाला होता. यंदा तो ११ जूनपर्यंत दाखल होईल असा अंदाज आहे.
काही दशकांपूर्वी ६ जूनला मान्सून नियमितपणे यायचा; पण आता सारेच बदलले आहे. दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो यंदा तो एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी येणार आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेत ४ दिवसांचा कमी-जास्त बदल होऊ शकतो त्यामुळे २८ मे ते ३ जूनदरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून वादळी वा-यासह अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने उन्हाळी पिकासह आंब्याचे मोठे नुकसान झाले. उन्हाळी मका, बाजरी, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. एकीकडे उन्हाच्या तीव्रतेने नागरिक त्रस्त असताना दुपारनंतर वातावरणात बदल होतो आणि ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह तसेच वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडतो त्यामुळे उन्हाळी पिके आणि फळबागांचे नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस झाला तर त्याचा मोसमी पावसावर परिणाम होतो. कृषी क्षेत्रासाठी मान्सून महत्त्वाचा आहे. देशाचे अर्थकारणच त्यावर अवलंबून आहे त्यामुळे अपेक्षिल्यानुसार तो मनसोक्त बरसावा हीच अपेक्षा.