दापोली : प्रतिनिधी
आपले हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वात हृदयात राम व हाताला काम आहे. मात्र, विरोधकांचे हिंदुत्व इतरांचे घर जाळणारे असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे केला.
येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी पद गेल्याचे दु:ख केले नाही. मात्र, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेल्यावर त्यांना अतोनात दु:ख झाले.
मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात स्थिरता होती, असे येथील उद्योगपतींचे मत आहे. सध्या राज्यात रोजगारनिर्मिती बंद झाली आहे. आहेत ते उद्योग व रोजगार गुजरातला पळवले जात आहेत.
येथील तरुणांच्या कपाळावर जात-धर्म लिहिलेला नाही. तरुणांना काम हवे असते. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यावर प्राधान्याने काम करेल, असेही ते म्हणाले आणि त्यांनी आघाडी सरकार आल्यास कोणत्या योजना राबवल्या जातील, हेही सांगितले.
ही लढाई फक्त राज्य वाचवण्याची
ही लढाई आमदार होण्यासाठी नाही तर राज्य वाचवण्यासाठी आहे. योगी आदित्यनाथ व अमित शहा हे बाहेरून येऊन गुजरात व यूपीचे मॉडेल दाखवतात. मात्र, कोविडच्या काळात गंगेमध्ये वाहिली तशी महाराष्ट्रात प्रेते वाहिली नाहीत व गुजरातमध्ये ज्याप्रमाणे ऑक्सिजनला रांगा लावाव्या लागल्या तशा महाराष्ट्रात लावाव्या लागल्या नाहीत. कारण येथे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्र धर्माला जागून जात-पात न पाहता सर्वांचे जीव वाचवले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.