मुंबई : आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनाही आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. यावर ‘आम्ही भाजपासोबत फॉर्म्युल्यावर चालत नाही तर महायुतीमध्ये मैत्रीवर चालतो’ अशा प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. आम्हाला ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. निष्क्रिय सरकार आणि काम करणारे सरकार हे लोकांना लवकरच कळेल, जे लोक बिल्डरला विकले गेले असतील, त्यांनी विकले जावे. आम्ही बिल्डरला विकले गेलेले लोक नाहीत असा टोला केसरकरांनी विरोधकांना लगावला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मनोज जरांगे यांच्याबद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावं याला सुद्धा लिमिट आहे. मराठवाड्यात कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्ही जे नोटिफिकेशन काढले ते कायम करायचं ही त्यांची मागणी आहे. आलेल्या हरकतींवर विचार करून अध्यादेश काढावा लागतो. ही जर कायदेशीर प्रक्रिया त्यांना माहीत नसेल, तर आमचं नोटिफिकेशन रद्द होईल. कायदेतज्ज्ञांकडून या गोष्टी समजून घ्याव्या.
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचे नूतनीकरण करून घेतले होते. मात्र, मागील पाच महिन्यांत नूतनीकरणावर तब्बल ३० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे, यावर दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, महाराष्ट्र वैभवशाली राज्य आहे. लहान लहान गोष्टी घ्यायच्या आणि लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा. महाविकास आघाडीच्या काळात किती मंत्र्यांच्या घरावर खर्च झाला याचा सुद्धा तपशील मी तुम्हाला देईल. बंगल्यावर खर्च करणे आणि तो सुद्धा मेंटेनन्ससाठी ही एक कंटिन्यूअस प्रोसेस असते आणि हे काम पीडब्ल्यूडी करते असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार गमावले
उद्धव ठाकरे हे बुलडाणा दौ-यावर असून २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारे मनोज जरांगे यांचे आंदोलन लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी आपला २४ तारखेचा हिंगोली दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे. यावर केसरकर म्हणाले, कोणालाही न भेटता पॅलेस पॉलिटिक्स करायचं यात सगळं त्यांनी गमावलं आहे. काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांचे विचार गमावले आहेत. भाजप-सेनेतील मैत्री बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे. अजित पवार आल्यामुळे याला अधिक मजबुती प्राप्त झाली आहे असे केसरकर यावेळी म्हणाले.