23.3 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रआरक्षणावरून जरांगेंची फसवणूक होतेय!

आरक्षणावरून जरांगेंची फसवणूक होतेय!

नागपूर : मराठा आरक्षणावरून सरकार मनोज जरांगे यांची फसवणूक करत आहे, असा घणाघाती आरोप माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. आता मराठ्यांना जे आरक्षण दिले गेले आहे, ते कोर्टात टिकणारे नाही. घटनातज्ज्ञही हेच सांगत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला डोळ्यांपुढे ठेवून सरकारने घाईने आरक्षण दिल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

या सर्व घडामोडींत मनोज जरांगे यांची फसवणूक सरकार करत आहे. जरांगे यांना आंदोलन करण्यापासून रोखण्यासाठी सरकार हा सर्व प्रकार करीत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शेतक-यांच्या मुद्यांवरूनही देशमुख यांनी सरकारला चिमटे काढले आहेत. कांद्याचे दर पुन्हा आज कोसळले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.

कापसाचे भाव पडले आहेत. परदेशातून कापूस आयात केला जात आहे. कापसाची निर्यात होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आमच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कापसाला १२ ते १३ हजार दर होता. मात्र, सरकार बदलताच धोरणही बदलले. त्यामुळे राज्य सरकारने सकारात्मक पावलं उचलून कापसाला १४ हजार रुपये भाव दिला पाहिजे आणि कांदा निर्यातबंदी उठवून निर्यात दर कमी करण्यासाठीही आमदार देशमुख आग्रही आहेत. सरकार याकडे लक्ष देत नसून संत्रा, सोयाबीन, असो की कापूस यावर निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुका आल्या असल्याने शरद पवार गटाला अडचणीत आणण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे. जो पक्ष शरद पवार यांनी काढला, ते चिन्ह व पक्ष काढून घेतले गेले आहे. अदृश्य शक्तीच्या सहकार्याने हे घडत आहे. मात्र, आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात आम्हाला न्याय मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. तूर्तास चिन्हासाठी दिलासा मिळाल्याचे देशमुख म्हणाले आहेत.

पुणे ड्रग्ज धाडसत्र..
ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अनिल देशमुख यांनी सरकारला घेरले आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणावरून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सातत्याने ड्रग्ज रॅकेट हे अनेक शहरांत जोरदार सुरू आहे. यासाठी मी विधानसभेत प्रश्न मांडला होता. आता याची चौकशी सुरू झाली असून, हा व्यवहार कसा केला जातो, हे लवकरच उघड होणार असल्याचेही ते म्हणाले. पोलिसांनी सतर्क राहून कारवाई केल्यास महाराष्ट्राचा उडता पंजाब होणार नाही, असे खोचक वक्तव्य आमदार देशमुख यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR