वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. आता या हल्ल्यात अमेरिकेचा कट्टर शत्रू इराणचेही नाव जोडले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना इराण ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. धमकीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी ट्रम्प यांच्या सुरक्षेतही वाढ केली होती.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, यूएस सीक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्प यांच्या प्रचार पथकाला इराणच्या धोक्याची माहिती देण्यात आली होती. यानंतर ट्रम्प यांची सुरक्षा वाढवण्यात आली. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, इराणच्या धमकीला प्रतिसाद म्हणून सीक्रेट सर्व्हिसने जूनमध्ये ट्रम्प यांची सुरक्षा वाढवली होती. यामध्ये एजंट, ड्रोन आणि रोबोटिक कुत्रे यासारख्या अतिरिक्त प्रति-हल्ला आणि प्रति-स्निपर उपायांचा समावेश आहे.
माहिती कशी मिळाली?
इराणच्या संभाव्य कारवाईची माहिती ुमन सोर्स इंटेलिजन्सच्या माध्यमातून मिळाली होती. २०२० मध्ये इराकमध्ये इराणच्या कुड्स फोर्स कमांडर कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचा आदेश दिल्यानंतर ट्रम्प आणि त्यांचे माजी परराष्ट्र सचिव माईक पोम्पीओ यांच्यासह अनेक अधिकारी धमक्यांना सामोरे जात आहेत. दरम्यान, १४ जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करणा-या आरोपीचा इराणशी कोणताही संबंध नाही. तो पेनसिल्व्हेनियाच्या बेथेल पार्कचा रहिवासी होता.