लातूर : प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभागाने २१ व्या पशुगणनेच्या तयारीसाठी जोरदार तयारी केली आहे. या पशुगणनेचे महत्व अधोरेखित करताना, जिल्ह्यातील २३५ अधिकारी, कर्मचारी, प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१ वी पशुगणनेस दि. १ सप्टेंबर पासून जिल्हयात सुरूवात होणार आहे. आगामी काळात पशुधनासाठी योजना राबविताना या पशुगणनेचा आधार मिळणार आहे.
२१ वी पशुगणना दि. १ सप्टेंबर पासून सुरु होणार असून, ती दि. ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या गणनेत ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबातील सर्व प्रकारच्या पशुधनाची संख्या नोंदविली जाणार आहे. गणनेच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी विशेष ऑनलाईन प्रणालीचा मोबाईल अॅपद्वारे वापर करण्यात येणार आहे.
जिल्हयात ५ लाख पशुधन
२० व्या पशुगणनेच्या नुसार जिल्हयात ५ लाख ११ हजार ६५० गाय, बैल, म्हैस असे पशुधन आहे. यात २ लाख ५६ हजार १८० गाय व बैल आहेत. २ लाख ५५ हजार ४७० म्हैस आहेत. ३५ हजार ४५मेंढया, १ लाख ४८ हजार ३१९ शेळया आहेत. तर ५ हजार ५१७ वराह आसल्याची नोंद झाली होती. त्यामुळे २१ व्या पशुगणनेत जिल्हयात पशुधनाची वाढ होते की घट याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे.
प्रशिक्षणार्थींना मोबाईल अॅपच्या वापराचे मार्गदर्शन
अधिकारी व कर्मचा-यांना पशुसंवर्धन विभागाच्या योजनेनुसार सखोल अभ्यास आणि प्रात्यक्षिक अनुभवावर आधारित प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवसीय प्रशिक्षणात २३५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. प्रशिक्षणार्थींना मोबाईल अॅपच्या वापराचे आणि विविध प्रगणन तंत्रज्ञानाचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आल्यामुळे आचूक आकडेवारी नोंदवणाासाठी मदत होणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. श्रीधर शिंदे यांनी सांगीतले.