नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर मंदिरास काही दिवसांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निकटवर्तीय असलेल्या मनोज मोदी यांनी भेट दिली होती. त्यावेळी, त्र्यंबकेश्वर मंदिरातील सोन्याचा मुकुट बनविण्यासाठी सोनं देण्याचं त्यांनी म्हटलं होतं.
मनोज मोदी यांनी भेट दिल्यानंतर त्र्यंबकेश्वर देवस्थानला सव्वा किलोचे सोने दान केले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी मागील महिन्यात दर्शनासाठी आले होते, त्यावेळी देवस्थानच्या विश्वस्तांनी २०० वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नव्याने बनविण्याचा संकल्प त्यांना सांगितला होता. देशभरातील भक्तांच्या सुवर्ण दानातून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनविला जाणार आहे, त्यापैकी पाच किलोहून अधिक सोने देवस्थानला दानाच्या स्वरूपात प्राप्त झाले आहेत. आता, उर्वरित सोने अर्पण करण्याचे मनोज मोदी यांनी म्हटले होते. त्यानुसार, मोदी यांचे सहकारी हितेश यांनी आज सपत्नीक येऊन सव्वा किलो सोने म्हणजेच १२५ तोळे सोने, ज्याची बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे १ कोटी रुपये आहे, तेवढं सोनं अर्पण करण्यात आलं आहे.
कोण आहेत मनोज मोदी
मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन आहेत. मुकेश अंबानी आणि मोदी हे कॉलेजपासूनचे मित्र असून ते ५५ वर्षांचे आहेत. मूळ गुजराती कुटुंबातील असलेल्या मोदींनाच मुकेश अंबानी यांनी १५०० कोटी रुपयांचे २२ मजल्यांचे अलिशान घर गिफ्ट दिले. मोदी यांनी १९८० साली रिलायन्स इंडस्ट्रीसोबत कामाला सुरुवात केली होती. तेव्हापासून ते अत्यंत विश्वासू आणि कौटुंबिक सदस्य मानले जातात.