27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसंपादकीयउष्णतेचा कहर

उष्णतेचा कहर

देशभरात यंदा उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. राजधानी दिल्लीत उच्चांकी तापमान नोंदले गेले. अनेक राज्यांत पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला. अस उका्डयाने नागरिक हैराण झाले. उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात ही अवस्था असतानाच पूर्वकडील राज्यांत रेमल चक्री वादाळामुळे मुसळधार पाऊस झाल्याने पूर आणि भुस्खलनामुळे मनुष्यहानी झाली. राजधानी दिल्लीचे तापमान ५२.३ अंशावर पोहोचले होते. हा आजवरचा उच्चांक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. वाढत्या तापमानामुळे विजेची मागणीही वाढली. राजस्थानातून येणा-या उष्ण वा-यामुळे दिल्लीचे तापमान वाढले. देशातील उत्तर व पूर्वेकडील राज्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उष्माघातामुळे किमान ५० जणांना प्राणास मुकावे लागले. यात उत्तर प्रदेश, बिहारमध्ये निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या २५ कर्मचा-यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, बिहार, ओडिशा, झारखंड या राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिहार आणि ओडिशामध्ये २४ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला.

देशात सध्या उष्णतेची लाट असून गत काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पंतप्रधान मोदींनी या संदर्भात रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबविण्याचे आदेश दिले आहेत. यंदा संपूर्ण देशभरात उष्णतेचा कहर पाहावयास मिळाला. गत काही वर्षांत जगभरात अनेक ठिकाणी विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे जगभरातच सूर्य आग ओकत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उष्णतेच्या लाटांमध्ये आता सामान्य उन्हाळ्याच्या हवामानापेक्षा ५ ते ९ अंश सेल्सिअस जास्त तापमान नोंदविले जात आहे. ही स्थिती चिंताजनक आहे. उष्णतेच्या लाटा आरोग्यासाठी सर्वांत मोठा धोका ठरत आहे. २०२३ हे वर्ष जागतिक पातळीवर सर्वांत विक्रमी उष्ण वर्षे म्हणून नोंद झाली होती. पंरतु २०२४ हे वर्ष आजपर्यंतचे अत्यंत उष्ण वर्षे ठरण्याची शक्यता आहे. भारतातील वार्षिक सरासरी तापमान १९०० सालाच्या तुलनेत सुमारे ०.७ अंश सेल्सिअसने वाढले आहे. मात्र संपूर्ण जगाचा विचार केल्यास जगभरातील सरासरी तापमानात १.५९ अंश सेल्सिअसपेक्षा अधिकची वाढ झाली आहे.

गत काही वर्षांत आधुनिकीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली भारतात सर्वच लहान-मोठ्या शहरात मोठ्या प्रमाणात उंचच उंच इमारतींचे जंगल तयार झाले आहे. मोठे रस्ते प्रकल्पही तयार झाले आहेत. सध्याच्या युगात त्याला ‘काँक्रीटचे जंगल’ म्हटले जाते. कारण गत काही वर्षांत पृथ्वीवरील झाडांचा हिरवेपणा कमी होऊन या सिमेंटच्या जंगलांचा पांढरेपणा वाढत चालला आहे. त्याचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत. ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायरमेंट’ या संस्थेने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूरू, हैदराबाद या महानगरातील काँक्रिटीकरणामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे. वातावरणातील आर्द्रताही वाढत चालल्यामुळे मानवी शरीरावर अनिष्ट परिणाम होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पूर्वी दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात मोठा फरक असायचा पण २०१० नंतर या चित्रातही फरक पडला आहे. दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यातील फरक कमी झाल्यामुळे रात्रीसुध्दा उष्णता तापदायक ठरू लागली आहे. शहरातील वाढते काँक्रिटीकरण आणि वातावरणातील वाढती आर्द्रता ही मानवी जीवनासाठी अत्यंत घातक ठरणार आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या कालावधीत घाम येण्याच्या प्रक्रियेमुळे मानवी शरीर थंड राहते पण वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे घाम येण्याचे प्रमाणही कमी होते.

त्यामुळे शरीर थंड राहण्यात अनेक अडचणी येतात. विकासाच्या नावाखाली हरित जंगले तोडून काँक्रीटची जंगले उभारण्याचे जे प्रयत्न गेल्या काही वर्षांत चालू आहेत. त्याचे परिणाम आता अपरिहार्यपणे भोगावे लागते आहेत. देशात ज्या ठिकाणी हिरवाईचे प्रमाण जास्त आहे तेथे उष्णतेचे प्रमाण कमी आहे आणि पावसाचे प्रमाण जास्त आहे. उष्णतेचे प्र्रमाण वाढल्यामुळे जलाशयातील पाण्याची पातळी कमी होते. परिणामी पाणीटंचाईची ओरड सुरू होते. हे सारे काँक्रिटीकरणाचे तापदायक परिणाम आहेत. एखाद्या पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीसाठी अनेक झाडे तोडली जातात, नियमाप्रमाणे तेवढी झाडे लावली जात असली तरी त्यातली किती जगतात हे कोण बघणार! जी झाडे १०० वर्षे होती ती तोडून दुसरेकडे जी झाडे लावण्यात येतात त्याचा फायदा कधी मिळणार याचाही विचार केला पाहिजे. ‘पुढील पिढीचा विचार करून विकास करावा’ हे तत्त्व जरी तत्वत: मान्य असले तरी सध्या काँक्रिटीकरणाच्या नावाखाली जो काही विकास सुरू आहे त्यामुळे पुढील पिढीच्या नशिबी काय लिहून ठेवले आहे त्याची कल्पनाही करता येणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR