22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्र‘एचआयव्ही’ झाल्याची अफवा, कुटुंबाला टाकले वाळीत

‘एचआयव्ही’ झाल्याची अफवा, कुटुंबाला टाकले वाळीत

बीडमधील धक्कादायक घटना सुप्रिया सुळेंचा संताप

बीड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह अनेक गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. आता बीडमधील आष्टी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका गावातील मुलीच्या मृत्यूनंतर गावात एक अफवा पसरली आणि या अफवेमुळे गावक-यांनी मृत मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, एचआयव्ही झाल्याच्या अफवेने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. विशेष म्हणजे ही अफवा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाकडून केला जात आहे. आष्टी तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरुणीचा मागील १० ते १२ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मृत महिला ही विवाहित असून सासरी आजारी पडली होती.

सतत आजारी असल्याने सासरच्यांनी महिलेला तिच्या माहेरी आणून सोडले. त्यानंतर ब्रेन ट्युमरने मुलीचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मात्र, मुलीवर अन्त्यसंस्कार झाले त्यावेळी डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबीयांना मुलीला एचआयव्ही असल्याचे सांगत कुटुंबीयांनाही टेस्ट करून घेण्यास सांगितले. पण मुलीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला मात्र, डॉक्टर आणि पोलिसांनी कुटुंबालाही एचआयव्ही टेस्ट करण्यास सांगितल्याने कुटुंबाला धक्का बसला.

एचआयव्हीमुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली होती. मात्र, आमच्या कुटुंबाबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे, असा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे. तसेच या अफवेमुळे पीडित कुटुंबातील एका महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कुटुंबातील एका सदस्याने म्हटले आहे. एचआयव्हीबाबत अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग व पोलिसांचा हात असल्याचा आरोपही या कुटुंबाने केला आहे. दुस-या बाजूला, वैद्यकीय अधिका-यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अशा अफवा पसरवल्या जाऊ नयेत : सुप्रिया सुळे
अशा अफवा पसरवल्या जाऊ नयेत. एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल तर त्या व्यक्तीला उपचार दिले पाहिजेत. अशा अफवा पसरवून कोणालाही वाळीत टाकू नये. कुठल्याही कारणामुळे एखाद्या कुटुंबावर अन्याय करू नये. त्याचबरोबर एड्स हा आजार वेगवेगळ्या कारणांनी पसरतो. त्यांना वाळीत टाकण्यापेक्षा अशा लोकांना आधार द्यायला हवा. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR