ईरन्नाच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पूर्ण, आज निर्णय
लातूर : प्रतिनिधी
लातूरमधील नीट प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी ईरन्ना कोनगुलवार याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. आता यावर शनिवार दि. २० जुलै रोजी निर्णय दिला जाणार आहे. दरम्यान, एन. गंगाधरच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
ईरन्ना कोनगुलवार याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश त्रिपाठी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी फरार आरोपी ईरन्ना कोनगुलवार याच्या वतीने बाजू मांडताना अॅड. अक्षय प्र. तोतला यांनी कोनगुलवार निर्दोष आहे. सह आरोपी संजयने कथितपणे दिलेल्या खोट्या आणि बनावट माहितीच्या आधारे त्याला गोवण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच ईरन्ना आणि आरोपी गंगाधर यांच्यात एका पैशाचाही व्यवहार झालेला नाही, असे म्हटले तर सीबीआयच्या वतीने जिल्हा सरकारी वकील मंगेश महिंद्रकर यांनी फरार ईरन्नाने या गुन्ह्यातील इतर आरोपी एन. गंगाधरप्पा, संजय जाधव व जलील पठाण यांची ओळख करून दिली. तसेच त्याने मुलीच्या गुणवाढी संदर्भात एन. गगाधरप्पा याची यापूर्वी भेट घेतली होती. याकामी त्याच्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते. त्यामुळे चौकशीसाठी त्याला सीबीआयच्या ताब्यात देण्याची गरज आहे, असे म्हटले. दोघांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला. यासंबंधी शनिवारी निर्णय सुनावला जाणार आहे.
दरम्यान, एन. गंगाधरप्पाच्या न्यायालीन कोठडीची मुदत आज संपल्याने न्यायालयात हजर करण्याची शक्यता होती. परंतु हजर न करता सीबीआयच्या विनंतीवरून एन. गंगाधरप्पाच्या न्यायालीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केल्याचे जिल्हा सरकारी वकील अॅड. मंगेश महिंद्रकर यांनी सांगितले.