सोलापूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात राष्ट्रीय सेवा योजनेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा क्रेडिट सिस्टीममध्ये होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, पीएम उषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. त्याचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. दामा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण भोपळे, एटीआय अहमदनगरचे समन्वयक डॉ. गोकुळदास गायकवाड, वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे, माय भारतचे प्रा. गजानन गंभीरे, सायबर तज्ञ अविनाश पाटील, पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, एनएसएसचे जिल्हा समन्वयक डॉ. वीरभद्र दंडे, महेंद्र घागरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.
प्र-कुलगुरू डॉ. दामा म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची कामगिरी चांगली असून यंदाच्या वर्षी या विभागाकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झालेले आहे. वेगवेगळे उपक्रम ही या विभागाकडून राबविण्यात आले आहे. त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक भोपळे यांनी सायबर क्राईम विषयी माहिती दिली. सायबर क्राईम घडू नये, यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे याबाबत त्यांनी आवाहन केले. यावेळी युथ फॉर माय भारत, डिजिटल साक्षरतेसाठी युवक, सायबर सिक्युरिटी, कृती आराखड्यानुसार कार्यक्रमाचे नियोजन,याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या उपस्थितीत सायंकाळच्या सत्रात समारोपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी कुलगुरूंनीही कार्यक्रमाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.