28.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeराष्ट्रीयएप्रिल ते जूनदरम्यान देशात उष्णतेची लाट!

एप्रिल ते जूनदरम्यान देशात उष्णतेची लाट!

तापमान सामान्यपेक्षा जास्त राहणार, राज्यांना सतर्कतेचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवामान विभागाने एप्रिल ते जून या कालावधीत भारतातील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मध्य आणि पूर्व भारत तसेच उत्तर-पश्चिम मैदानी भागात उष्णतेची लाट अधिक दिवस टिकून राहू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली.

आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल. या दोन्ही भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून या काळात उत्तर आणि पूर्व भारत, मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भारताच्या मैदानी भागात उष्णतेची लाट सामान्यपेक्षा दोन ते चार दिवस जास्त राहण्याची शक्यता आहे. साधारणत: एप्रिल ते जून या काळात भारतात चार ते सात दिवस उष्णतेची लाट असते. बहुतांश भागात किमान तापमानही सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
दक्षिणेकडील आणि उत्तर-पश्चिम भागातील काही भागांत तापमान सामान्य राहू शकते. उत्तर-पश्चिम आणि ईशान्येकडील काही ठिकाणे वगळता देशातील बहुतांश भागात किमान तापमान सामान्यापेक्षा जास्त असेल, असे महापात्रा यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह
या राज्यांत लाट
सामान्यपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट राहणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आणि तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागांचा समावेश असणार आहे.
विजेचा वापर वाढणार
यंदाच्या उन्हाळ््यात विजेच्या मागणीत ९ ते १० टक्के वाढ होण्यासाठी भारताने तयार राहावे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी ३० मे रोजी देशभरातील सर्वोच्च वीज मागणी २५० जीडब्ल्यूच्या वर गेली होती, जी आधीच्या अंदाजापेक्षा ६.३ टक्के अधिक होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR