28.5 C
Latur
Friday, March 14, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

एसटी भाडेवाढीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

राज्यभरात ठिकठिकाणी चक्का जाम

मुंबई : प्रतिनिधी
एसटी महामंडळाने नुकतीच एसटीच्या तिकिटात दरवाढीची घोषणा केली. या दरवाढीचा विरोध करत आज राज्यभरातील विविध जिल्ह्यांत उद्धव सेनेने चक्का जाम आंदोलनाचा पुकारा केला आहे. राज्यातील विविध डेपोबाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक दिसले. त्यांनी ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे. भाडेवाढ मागे घेतली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिट दरात १४.९५ टक्के वाढ झाली. राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलिस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजुरी दिली. पण या भाडेवाढीमुळे कोकणातून पुणे आणि बोरिवली प्रवासाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पुण्याचे प्रवासी तिकिट ५४० रुपयांवरून ६२४ रुपये झाले आहे. तर रत्नागिरी-बोरिवलीच्या तिकिटासाठी ५५० रुपये मोजावे लागत होते. त्यासाठी आता ६३४ रुपये मोजावे लागणार आहेत.

बीड बसस्थानक परिसरात आंदोलन
बीड- एसटी तिकिट दरवाढीविरोधात बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिका-यांकडून बीड बस स्थानक परिसरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. दरवाढ कमी करण्यात आली नाही तर राज्यभर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना पदाधिका-यांनी दिला आहे.

अमरावतीत तीव्र संताप
एसटी महामंडळाने तिकिट दरात १५ टक्के केलेल्या वाढीच्या निषेधार्थ आज अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे गटाचे चक्का जाम आंदोलन सुरू आहे. बस स्थानकाबाहेर एकही बस जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाने घेतला आहे.

सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने

शिवसेना ठाकरे गटाकडून एसटी तिकिट दरवाढीविरोधात निदर्शने सुरू आहेत. सोलापूर एसटी बस स्थानकाच्या गेटवर ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. एसटीचे तिकिट दर वाढवल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक दिसला. एसटीचे वाढवलेले तिकिट दर कमी करावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR