बंगळुरू : वृत्तसंस्था
काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातच काँग्रेस चन्नगिरीचे आमदार शिवगंगा बसवराज यांनी केलेल्या भविष्यवाणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जेडीएसचे ११ आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होतील असं शिवगंगा बसवराज यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात जेडीएस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्यारितीने विरोधी पक्ष फुटला तसाच कर्नाटकात काँग्रेस त्यांचं सरकार आणखी मजबूत करण्यासाठी विरोधी पक्ष फोडणार अशी चर्चा सुरू आहे.
आमदार शिवगंगा बसवराज म्हणाले की, जेडीएसचे एकूण ११ आमदार काँग्रेसमध्ये लवकरच सहभागी होतील. डीके शिवकुमार पक्ष संघटनेत सगळ्यांना एकत्र आणत आहेत, ते दुस-याला शक्य होईल का? बाकी लोक अशाप्रकारे अन्य पक्षातून नेते आणण्यास समक्ष नाहीत. काही लोकांना केवळ सत्ता हवी. काहीजण म्हणतायेत शिवकुमार यांना असं ऑपरेशन करू द्या मग आम्ही पाहू. ते केवळ आयत्या बिळावर नागोबा आहेत परंतु शिवकुमार काम करत राहतात असं त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील पक्षीय संख्याबळ…
दरम्यान, कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ सदस्य आहेत त्यात सत्ताधारी काँग्रेसकडे १४० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात १ आमदार अपक्ष आणि १ सर्वोदय कर्नाटक पक्षाचा आहे. विरोधकांची संख्या ८४ इतकी आहे. त्यात भाजपाकडे ६६ आणि जेडीएसकडे १८ आमदार आहेत. कर्नाटकातील विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहेत. जेडीएसच्या १८ पैकी ११ आमदार जर काँग्रेससोबत गेले तर त्यांच्यावर पक्षांतर बंदीचा कायदाही लागू शकत नाही त्यामुळे येत्या काळात कर्नाटकात राजकीय भूकंप घडतो का हे पाहणे गरजेचे आहे.