नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने ६ पदके ंिजकली. यातील सर्वाधिक तीन पदके नेमबाजांनी मिळवून दिली. खंरतर आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांनी केलेली ही सर्वोत्तम कामगिरीही ठरली. त्यामुळे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश संपादन केलेल्या खेळाडूंचा गुणगौरव करण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजीमध्ये भारतासाठी तीन कांस्यपदके मिळवून दिली आहेत. नेमबाजीमध्ये भारतासाठी आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना एनआरएआयतर्फे रोख बक्षिसेही जाहीर झाली आहेत. भारतासाठी दोन कांस्यपदके जिंकून नेमबाजीमध्ये विक्रम रचणा-या मनू भाकरला ४५ लाख रुपये, ५० मीटर एअर रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला तिसरे कांस्य पदक मिळवून देणा-या स्वप्नील कुसळेला ३० लाख रुपये, तर मनू भाकर सोबत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र गटात भारताला कांस्यपदक मिळवून देणा-या सरबजोत सिंगला १५ लाख रुपये बक्षीस एनआरएआयकडून जाहीर झाले आहे.
एनआरएआय सत्कार समारंभाला पॅरिस ऑलिम्पिकमधील संपूर्ण नेमबाजी पथक उपस्थित होते. सोबतच पथकातील इतर सदस्यांना एनआरएआयतर्फे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. उच्च कार्यप्रदर्शन संचालक डॉ. पिएर बुशॉम, परदेशी रायफल प्रशिक्षक थॉमस फारनिक, विदेशी पिस्तूल प्रशिक्षक मुंखब्यार दोर्जसुरेन, राष्ट्रीय १० मीटर पिस्तूल प्रशिक्षक मीसमरेश जंग आणि राष्ट्रीय ५० मीटर रायफल प्रशिक्षक मनोज कुमार यांच्यासह सहाय्यक कर्मचारी देखील उपस्थित होते. त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
एनआरएआयचे प्रमुख कालिकेश सिंग देव म्हणाले, आमचे नेमबाज, प्रशिक्षक आणि संपूर्ण सहकारी कर्मचा-यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. या खेळात ते अग्रेसर आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे ही साधी कामगिरी नाही. त्यांना मिळणा-या सर्व प्रशंसा आणि पुरस्कारांना ते पात्र आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या कामगिरीमुळे संपूर्ण भारतातील नेमबाजांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल. खेळाडूंसोबतच मैदानाबाहेर मेहनत घेणा-या संपूर्ण एनआरएआय टीमचे देखील अभिनंदन!