मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास चालेल्या त्यांच्या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे. तसेच ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही, असा शब्दही फडणवीसांनी दिल्याचे भुजबळांनी सांगितले.
नाराज असलेल्या भुजबळांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठींवर सध्या भर दिला आहे. त्यातच त्यांनी सोमवारी फडणवीसांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण झाले आहे. भुजबळांसोबत समीर भुजबळही होते. या भेटीनंतर छगन भुजबळांनी मीडियाला याबाबत माहिती दिली.
भुजबळ म्हणाले, मी आणि समीर भुजबळ यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सामाजिक, राजकीय अशा अनेक गोष्टींची चर्चा झाली. काय-काय घडले काय सुरू आहे. ओबीसींच्या बैठका होत आहेत. त्यावर त्यांनी चांगल्याप्रकारे चर्चा केल्याचे भुजबळांनी सांगितले. त्यावर फडणवीसांनीही महायुतीला मिळालेल्या विजयात ओबीसींचे मोठे पाठबळ आहे, असे सांगितल्याची माहिती भुजबळांनी दिली.
एवढा मोठा विजय मिळाला, त्यामध्ये अनेक कारणे आहे. त्यासोबतच ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणात मिळाले. त्यामुळे महाविजय मिळाला आहे. आपण खरोखरच सर्वांचे आभार मानले पाहिजेत. त्यामुळे ओबीसींचे नुकसान होणार नाही, याची काळजी मलाही आहे. मी कदापीही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे भुजबळ म्हणाले.
सध्या घडत असलेल्या घटनांमुळे ओबीसी नाराज आहे. आताच अधिवेशन संपले आहे. मी जरूर यावर विचार करेन. नवीन वर्ष आहे, शाळांना सुटी आहे. त्यामुळे मला आठ-दहा दिवस द्यावेत. आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे मार्ग शोधून काढू. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, मी त्यावर साधक-बाधक विचार करत आहे. सर्वांनी शांततेत पुढे जावे. त्यासाठी मला वेळ द्यावी, मार्ग काढण्यासाठी चर्चा करू, असे फडणवीसांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.