पुणे : कडूस (ता. खेड) येथील दक्षणा फाऊंडेशनमधील जेई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणा-या परराज्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. त्यापैकी २२ मुले आणि ७ मुली असे २९ विद्यार्थ्यांना उपचारासाठी चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील ४ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली आहे. २ विद्यार्थ्यांना वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दक्षणा फाऊंडेशन ही सेवाभावी आणि गैरसरकरी संस्था आहे. ही संस्था देशातील ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल परंतु अभ्यासातील हुशार विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रन्सच्या जेईई आणि नीट परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. देशभरातून विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या येथे सुमारे सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता.१९) रात्रीपासून जुलाब, तीव्र डोकेदुखी व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला.
शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांचा त्रास वाढल्याने उपचारासाठी त्यांना कडूसच्या प्राथमिक आरोग्य केंद्रानंतर चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी आणण्यात येत असून यात विद्यार्थिनींचासुद्धा सहभाग आहे.
या विद्यार्थ्यांवर चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंदिरा पारखे, डॉ कौस्तुभ गरड, डॉ मयुरी मालाविया, अलताभ पठाण, अर्चना धोंडवड, संध्याराणी हजारे,अर्चना छानवाल, वर्षा गायकवाड, मुख्तार शेख, आशा नवगिरे, धनंजय घोसाळकर, माधुरी गोरडे, संगीता पिंगळे, वर्षा अनंदे, दीपक शेलार हे उपचार करत आहेत.