देवणी : बाळू तिपराळे
तालुक्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व परिसरात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा तडका वाढल्याने याचा विपरीत परिणाम रब्बी हंगामातील लागवड केलेल्या कांदा पिकावर झाला असल्याने, परिसरातील उन्हाळी कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याचा अंदाज शेतक-यांकडून वर्तविण्यात येत आहे.
परिसरात यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतक-यांंनी दरवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात उन्हाळी कांदा पिकाची लागवड केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून शेतातील उन्हाळी कांदा पिक हे तजेलदार दिसून येत होते परंतु सततच्या वातावरणात होणा-या बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा शिरकाव होऊन दिवसेंदिवस या रोगाचा शिरकाव वाढतच आहे. व कांदा फुगवणीवर याचा विपरीत परिणाम होऊन शेतक-यांना उत्पादनात घट पहावयास मिळणार असल्याचा अंदाज शेतकरी बांधवांकडून व्यक्त होत आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेले तालुक्यातील शेतकरी दरवर्षी अफाट खर्च करून कांदा लागवड करीत असून, दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना उत्पादनात मोठा फटका बसून, नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
मागील वर्षीदेखील , कांदा काढनिला आला असता व काही शेतकरी बांधवांची पहिल्या टप्प्यातील कांदा पिकाची काढणी सुरू असता परिसरात झालेल्या ब मौसमी अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले होते ब मोसमी पावसामुळे काढणी केलेला कांदा काढणी शिल्लक असलेला कांदा बाधित होऊन शेतक-यांना तो कांदा चाळीत भरल्यावर एका महिन्यात फेकून द्यावा लागला होता. त्या संकटातून कसेतरी बाहेर येत शेतक-यांनी यंदा दुष्काळाशी सामना करीत भाग भांडवल उभे करत कांदा पीक उभे केले परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, सतत असणारे दूषित व ढगाळ वातावरण उन्हाचा तडाखा यामुळे करपा रोगाने कांदा पिकावर शिरकाव केला आहे.