21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयकर्नाटकातील वाद चिघळला; शिवकुमारांची मंत्र्यांवर टीका

कर्नाटकातील वाद चिघळला; शिवकुमारांची मंत्र्यांवर टीका

बेंगळुरु : वृत्तसंस्था
कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी आपल्याच मंत्र्यांवर बुधवारी टीका केली. राज्यातील सत्तावाटपाबाबतच्या विविध चर्चांमुळे तेथील राजकारणही तापले आहे. डीके शिवकुमार यांनी वादग्रस्त विधानाबद्दल मंत्री सतीश जारकीहोळी यांना जाहीरपणे फटकारले आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल विधान केले होते. त्यांनी पक्षाला पूर्णवेळ नेत्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. या मुद्द्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली तेव्हा त्यांनी ते मागे घेतले.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले, तुम्हाला हे पद मीडियाकडून मिळू शकेल का? हे कोणत्याही दुकानात मिळत नाही. ते आपल्या कृतीतून मिळते. अशी विधाने सार्वजनिकरित्या करण्याऐवजी पक्षाच्या अंतर्गत योग्य माध्यमांद्वारे करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया डीके शिवकुमार यांनी दिली.

डीके शिवकुमार म्हणाले, जे नेते हायकमांडच्या आदेशांचे उल्लंघन करतात त्यांना काँग्रेसचे शिस्तबद्ध सैनिक मानले जाणार नाही. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा समावेश असलेले पक्ष नेतृत्वच असे निर्णय घेईल आणि कोणत्याही मंत्र्याने या संदर्भात कोणतेही विधान करू नये. या घडामोडीमुळे कर्नाटक काँग्रेसमधील वाढत्या अंतर्गत मतभेद आणि वाद पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR