18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरकाँग्रेसच्या रॅलीला ‘लय भारी’प्रतिसाद;  रितेश देशमुखांची हजेरी, तरुणाईत उत्साह

काँग्रेसच्या रॅलीला ‘लय भारी’प्रतिसाद;  रितेश देशमुखांची हजेरी, तरुणाईत उत्साह

लातूर : प्रतिनिधी
प्रचाराचा शेवटचा दिवस काँग्रेस महाविकास आघाडीच्या रॅलीने गाजला. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते, मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सुमारे तीन तास चाललेल्या या रॅलीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जागोजागी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा पुष्पहार खालून आणि फुलांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात येत होते. अमित देशमुख आणि रितेश देशमुख हे नम्रतेने प्रत्येक व्यक्त्तीचे अभिवादन स्वीकारताना दिसले. यावेळी आमदार अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनी भाषण करुन रॅलीची सांगता हनुमान चौकात केली.
या रॅलीत खासदार डॉ. शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सुळ, माजी महापौर स्मिता खानापुरे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष  राजा मणियार, शेकाप नेते अ‍ॅड. उदय गवारे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीची सुरुवात हनुमान चौक येथून झाली. पुढे रॅली हनुमान चौक, अक्षता कापड लाईन, गंज गोलाइ किंग कॉर्नर, भुसार लाईन, सुभाष चौक, अलंकार सिनेमा, जुनी कापड गल्ली, मस्जिद रोड, साळेगल्ली, गंजगोलाई, शिवाजी मार्ग, जुने गुळ मार्केट चौक, सराफ लाईन, लोखंड गल्ली, कामदार रोडने हनुमान चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रमुख नेत्यांच्या भाषणानंतर प्रचाराची सांगता झाली.
लातूरकरांना विजयाचा चौकार मारायचा आहे हे सांगत असताना आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. आगामी काळात गंजगोलाईसाठी विकासाचा मास्टर प्लॅन करायचा आहे. लातूरचा विकास काँग्रेसने केला आहे. इतर कुठल्याही पक्षाने लातूरचा विकास केलेला नाही. लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेस पक्षाशिवाय तुम्ही कोणालाच मतदान केलेले नाही. या महायुतीने महाराष्ट्राचे, लातूरचे वाटोळे केले आहे. लातूरमध्ये भ्रष्टाचार वाढला, गुंडगिरी वाढली, अवैध धंदे वाढले, दलालांचा सुळसुळाट वाढला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त्त केली.
सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी आमदार अमित देशमुख यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यापूर्वी लातूरकरांनी लातूरचे नेतृत्व निवडून दिले. त्यानंतर ते मराठवाड्याचे नेते झाले. आता यापुढे ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करण्याची काळजी घ्या. लातूरचा बिग बॉस तुमच्या प्रेमामुळे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उमेदवाराची गुणवत्ता पाहून मतदान करावे 
लातूरकरांनी उमेदवाराचा ट्रॅक रेकॉर्ड, बॅकग्राऊंड आणि मेरिट पाहून मतदान करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केले. काँग्रेसच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत ते जामिनावर बाहेर आहेत, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी लुबाडले, फसवले, धमकावले, लुटले. मात्र, काँग्रेसने अशी कामे कधीच केली नाहीत. आता अशा प्रवृत्ती लातूरमध्ये वाढीस येणार नाहीत, याची खबरदारी प्रत्येकाने बाळगली पाहिजे. लातूरची संस्कृती स्वच्छ, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत असणारी ही संस्कृती असल्याचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी यावेळी म्हटले. जिथे विषय गंभीर तिथे अमित देशमुख खंबीर असेही ते म्हणाले.
लातूर अजेंडा २०२४-२९ चे हनुमान चौकात प्रकाशन
यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख, सिनेअभिनेते रितेश देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या हस्ते वर्ष २०२४-२९ या येणा-या पाच वर्षांसाठी लातूरसाठीचा  लातूर अजेंडा २०२४-२९ हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.  लातूरकरांच्या सूचनांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती आमदार अमित देशमुख यांनी दिली. येत्या पाच वर्षात हा वचननामा पूर्ण करणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच युवकांसाठी काँग्रेसचे धोरणाचेही प्रकाशन यावेळी करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR