विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ख-या अर्थाने मंगळवारपासून सुरू झाली. अर्ज दाखल करण्याचा दिवस उजाडला तरी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम होता. निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्याने या दोन्ही आघाड्यांमधील पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची आवक-जावक सुरू आहे. राजकीय समीकरणांमुळे तिकिट मिळण्याची शक्यता दुरावल्याने अनेकांनी बंडाचे निशाण फडकावून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.
काही कारणाने अडगळीत पडलेले नेते मरगळ झटकून पक्षबदल करत तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसले. त्यामुळे सध्या विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेशाच्या सोहळ्यांची लाट आली आहे. भाजपकडून ऐरोली विधानसभेची उमेदवारी मिळालेले मुंबईतील बडे प्रस्थ गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान मोदी काँग्रेसमधील कोणत्या ‘घराणेशाही’ची बात करत आहेत? घराणेशाही अशा प्रकारेही चालवता येऊ शकते! वडील भाजपकडून तर पुत्र राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, आता बोला! माजी मंत्री राजकुमार बडोले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे कणकवलीतून लढणार आहेत. तर दुसरे सुपुत्र निलेश राणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत.
म्हणजे वडील खासदार आणि दोन्ही पुत्र आमदार… जय हो घराणेशाही! ही घराणेशाही भाजपातून होत असल्याने देशाला मोठा धोका होणार नाही ही बाब वेगळी! काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. वडील आणि भाऊ भाजपचे लोकप्रतिनिधी असताना त्यांनी थेट भाजपला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १९ वर्षांनी निलेश राणे शिवसेनेत परतत आहेत. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू करणा-या निलेश राणेचे हे चौथे पक्षांतर म्हणावे लागेल. शिनसेना सोडल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. तिथे खासदारकीही मिळवली होती. त्यानंतर त्यांनी नारायण राणेंनी काढलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला होता. नंतर राणेंनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे निलेश राणे पर्यायाने भाजपमध्ये दाखल झाले. आता ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.
महाविकास आघाडीत जाण्यासाठी ते उत्सुक असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा घ्या, अशी सूचना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिली आहे. भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराज नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. उमेदवारी न मिळालेले अथवा मिळण्याची शक्यता नसलेले इच्छुक तिकिटासाठी पक्षश्रेष्ठींची मनधरणी करण्यात गुंतले आहेत. पहिल्या यादीत स्थान न मिळालेले विद्यमान आमदार, नाराज नेते आणि उमेदवारीसाठी इच्छुक नेते यांची देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी गर्दी उसळली होती. यंदाच्या निवडणुकीत बहुतांश मतदारसंघांत बंडाचे वारे वाहू लागल्याचे दिसून येत आहे. ‘पक्षनिष्ठा’ हा विषयच या निवडणुकीतून गायब होतो की काय अशी स्थिती आहे. सत्तेची नशा इतकी चढली आहे की, मुलगा-बाप, भाऊ-बहीण, पती-पत्नी, गुरू-शिष्य ही नातीच गायब होतात की काय अशी भीती वाटते. मतदारांना तर गृहितच धरण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात सर्व तपास यंत्रणांना सजग राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पैशाच्या देवाणघेवाणीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. या संदर्भात काही मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहेत. अशा मतदारसंघांत होणारी पैशाची देवाणघेवाण, व्यवहार अथवा अन्य कोणत्याही संशयास्पद वित्तीय बाबींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होताच नोटांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. मंगळवारी रात्री पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी एका इनोव्हा गाडीत ५ कोटींची रोकड पकडली. ही गाडी सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मुलाची असल्याची चर्चा आहे. त्यावरून ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे प्रत्येक उमेदवाराला ५० कोटींची रसद पुरवत आहेत. त्याचा पहिला हप्ता म्हणून १५ कोटींचे वाटप झाले आहे. १५ कोटींची रोकड असलेल्या दोन गाड्या पकडण्यात आल्या होत्या. पैकी एक गाडी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून सोडण्यात आली असे उबाठा गटाचे संजय राऊत म्हणाले तर रोहित पवार यांनी गाडीतील रोकडीच्या थप्प्यांचा व्हीडीओच ट्विट केला.
महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठी रक्कम पकडली जाण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. आगामी काळात अशा अनेक गाड्या पकडल्या जातील. त्यातील रकमेवर कुणीच दावा करणार नाही आणि ही रक्कम नेमकी कुणाची आहे हे कधीच उघड होणार नाही! आचारसंहिता लागू झाली त्याच दिवशी राज्यातील बहुतेक मतदारसंघांत पहिला हप्ता पोहोचला होता. खेड-शिवापूर टोलनाक्यावर दोन गाड्या पकडण्यात आल्या, पैकी एक गाडी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आल्याने सोडून देण्यात आली, त्या गाडीत दहा कोटी रुपये होते. ते दहा कोटी ‘काय झाडी, काय डोंगार’कडे व्यवस्थित पोहोचले. उबाठा गटाचे कार्यकर्ते जमल्याने ५ कोटी पकडल्याचे दाखवावे लागले असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
निवडणूक आयोग केवळ कारवाई केल्याचे नाटक करील असेही ते म्हणाले. रोकड जप्त प्रकरणी ज्यांचे नाव घेतले जात आहे ते शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. जप्त रकमेशी माझा काडीमात्र संबंध नाही. ज्याची गाडी पकडण्यात आली, ती गाडी अमोल नलावडे यांची असून ते शेकापचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे अनेक उद्योग आहेत. नलावडे हे रस्ता बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांनी हे पैसे आपले असल्याचा दावा केला आहे. या पैशाचे काही राजकीय लागेबांधे आहेत काय याचा तपास सुरू आहे. आरटीओच्या नोंदीनुसार ही गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे, मात्र ती त्यांनी बाळासाहेब आजबे यांना विकली आहे म्हणे. आता निवडणूक काळात अशा अनेक सुरस कथा ऐकावयास मिळतील.