सोलापूर : प्रतिनिधी
कास पठार पाहण्याच्या निमित्ताने फिरण्यासाठी जाणा-या कामगारांवर काळाने घाला घातला आहे. माळशिरस तालुक्यातील कारुंडे गावाजवळ कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
लासुर्णे येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना फिरण्याच्या निमित्ताने कारमधून साताराकडे निघाले होते. सर्व कामगारांना कास पठार पाहण्यासाठी शहा हे कारमध्ये घेऊन निघाले असताना पहाटेच हा भीषण अपघात झाला. समोरून येणा-या टेम्पो व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारचा समोरचा भाग संपूर्णपणे दाबला गेला आहे. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिक लागलीच मदतीला धावले.
या भीषण अपघातामध्ये राजेश अनिल शहा (वय ५५), दूर्गेश शंकर घोरपडे (वय २८), कोमल विशाल काळे (वय ३२), शिवराज विशाल काळे (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश दादा लोंढे (वय २५), पल्लवी बसवेश्वर पाटील (वय ३०), अश्विनी दूर्गेश घोरपडे हे गंभीर जखमी झाले आहेत.